साताऱ्यातील एसटी आगाराचा अनोखा उपक्रम, मुक्कामासाठी येणाऱ्यांना गरम पाणी, उटण्यासह अभ्यंगस्नानाचे आयोजन

सातारा एसटी आगारात 100 हून अधिक वाहकांसाठी अभ्यंगस्नानाचे आयोजन केलं आहे. (Satara ST depot arrange Abhyangasnan for other drivers)

  • संतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा
  • Published On - 8:03 AM, 14 Nov 2020

सातारा : यंदाची दिवाळी वेगळी असली तरी ती आपल्या कुटुंबासोबत नातेवाईकांसोबत साजरी करता यावी, यासाठी यंदाही जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसटीतील चालक आणि वाहकांच्या सुट्ट्या रद्द केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर सातार्‍यात मुक्कामासाठी आलेल्या चालकांना आपण कुटुंबियांपासून दूर असल्याची भावना निर्माण होऊ नये यासाठी सातारा एसटी आगारात 100 हून अधिक वाहकांसाठी अभ्यंगस्नानाचे आयोजन केलं आहे. (Satara ST depot arrange Abhyangasnan for other drivers)

दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे म्हटलं जातं. नवीन कपडे घालून कुटुबियांसोबत दिवाळी साजरी करावी, गोड-धोड खावेत, असा प्रत्येकाचे नियोजन असते. पण काहींना हे शक्य होत नाही. दिवाळीचा सण हा राज्य परिवहन महामंडळासाठी गर्दीचा हंगाम असतो. या दिवसात प्रवाशांची गर्दी कित्येक पटीने वाढलेली असते. दिवाळीत चालक-वाहकांच्या सुट्या रद्द केल्या जातात.

त्यामुळे चालक-वाहक कर्तव्य म्हणून कामावर रुजू होतात. मात्र त्याच्या मनात कुटुंबियांपासून दूर असल्याची भावना असते. त्याच पार्श्वभूमीवर सातारा आगारातर्फे गेल्या 20 वर्षांपासून अभ्यंगस्नानाचे आयोजन केले जाते. सातारा आगारातर्फे दरवर्षी हा अनोखा उपक्रम पाहायला मिळतो. या आगारातील कर्मचारी लोकवर्गणीतून साहित्य आणून हा उपक्रम राबवितात. सातारा आगारातील कर्मचारी हा पाहुण्या कर्मचार्‍याच्या अंगाला उटणे लावतो, त्याला साबण लावून अंघोळ घालतात.

परगावी जाण्यासाठी भल्या पहाटे बसस्थानकात आलेल्या प्रवाशांनी हा उपक्रम पाहिल्यानंतर अनेकांना याचे कौतुक वाटते. दिवाळीपूर्वी सातारा आगारात मुक्कामाची गाडी घेऊन येणार्‍या चालक-वाहकांसाठी पहिल्या दिवशी अभ्यंगस्नानाचे नियोजन केले जाते. अंघोळीसाठी गरम पाणी, तेल, उटणे, साबण दिलं जाते. विशेष म्हणजे सातारा आगारातील कर्मचारी बाहेरगावावरुन आलेल्या एसटी चालक-वाहकांना दिवाळीच्या घरगुती रिवाजाप्रमाणे अंघोळ घालतात. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना खाण्यासाठी फराळ दिला जातो.

एसटी महामंडळाच्या खर्चात तरतूद नसली तरी आगारातील कर्मचारी खिशातून पैसा काढून हा उपक्रम राबवत आहेत. गेल्या 20 वर्षांपासून ही परंपरा अद्याप कायम सुरु आहे. (Satara ST depot arrange Abhyangasnan for other drivers)

संबंधित बातम्या : 

लोणार सरोवर आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित; आदित्य ठाकरेंचा मोठा निर्णय

शेतकऱ्यांना दिवाळी बोनस, सौभाग्यवतींना पैठणी आणि फराळ; गोधन डेअरीचं गिफ्ट