लाच घेताना रंगेहाथ पकडलं, चौकशीत कोट्यवधीचं घबाड सापडलं, सतीश चिखलीकर पुराव्याअभावी निर्दोष

चिखलीकरकडे दागिने आणि रोकड अशी  सुमारे 17 कोटींची मालमत्ता मिळाली होती. याशिवाय राज्यभरात त्याची जवळपास 78 ठिकाणी मालमत्ता आढळून आली होती.

लाच घेताना रंगेहाथ पकडलं, चौकशीत कोट्यवधीचं घबाड सापडलं, सतीश चिखलीकर पुराव्याअभावी निर्दोष

नाशिक : राज्याला हादरुन सोडणाऱ्या लाचखोरीप्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाचा मुख्य अभियंता सतीश चिखलीकर (Satish Chikhalikar) आणि शाखा अभियंता जगदीश वाघ (Jagdish Wagh) यांना पुराव्याअभावी निर्दोष ठरवण्यात आलं आहे. 2013 मध्ये एका ठेकेदारकडून 22 हजाराची लाच घेताना या दोघांना रंगेहाथ पकडलं होतं. मात्र ठोस पुरावा सिद्ध न होऊ शकल्याने जिल्हा सत्र न्यायालायाने दोघांची निर्दोष सुटका केली.

सतीश चिखलीकर नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते. त्यावेळी 2 मे 2013 रोजी एका तक्रारदाराकडून 22 हजारांची लाच स्वीकरतांना लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ अटक केली होती. लाचखोरीप्रकरणी अटक झाल्यानंतर, चौकशीमध्ये त्यांच्याकडे संपत्तीचं घबाड सापडलं होतं.

चिखलीकरकडे दागिने आणि रोकड अशी  सुमारे 17 कोटींची मालमत्ता मिळाली होती. याशिवाय राज्यभरात त्याची जवळपास 78 ठिकाणी मालमत्ता आढळून आली होती. 5 किलो सोने आणि 3 कोटीची रक्कम सापडली होती.

चिखलीकर हे मूळचे नांदेड जिल्ह्य़ातील चिखली गावचे रहिवासी आहेत. त्यांनी नांदेड जिल्ह्यात कुठेही नोकरी केली नसली तरी बँक ऑफ महाराष्ट्रच्या नांदेड शाखेत 35 लाखांची रोकड मिळाली होती.  याशिवाय अनेक ठिकाणी जमिनी, दागदागिने आणि रोकड सापडली होती.

मात्र या लाचखोरीप्रकरणात कोणतेही ठोस पुरावे न सापडल्याने कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं आहे.

दरम्यान चिखलीकर लाचखोरी प्रकरणातील या खटल्याच्या मूळ तक्रारीची प्रत गायब करुन त्याजागी बनावट प्रत तयार करुन आरोपपत्राला जोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाशिकच्या इतिहासात आणि संपूर्ण राज्यात गाजलेल्या चिखलीकर प्रकरणात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग असल्याची चर्चा होती. यासाठीच भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. मात्र असं असताना थेट न्यायालयातील कागदपत्रातच फेरफार झाल्यानं चिखलीकरला वाचवण्यासाठी नेमकं कोण काम करतंय याचा शोध घेतला जातो होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *