मला कुणाच्याही परवानगीची गरज नाही, राष्ट्रीय वारकरी परिषदेला पवारांचं आळंदीत उत्तर

कोणी सांगितलं की तुम्हाला परवानगी नाही, तर त्यांना वारकरी संप्रदायाचे विचारच समजले नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला

Sharad Pawar on Warkari Parishad, मला कुणाच्याही परवानगीची गरज नाही, राष्ट्रीय वारकरी परिषदेला पवारांचं आळंदीत उत्तर

पुणे : मला कुणाच्याही परवानगीची गरज लागत नाही, मला पसंत असलेल्या रस्त्याने मी जाईन. माझ्या रस्त्याशी मी तडजोड करणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला प्रत्युत्तर दिलं. पंढरपूरला मी नेहमी जात असतो, प्रसिद्धी करत नाही. पहाटे लवकर जाऊन विठ्ठलदर्शन घेत असतो, असं पवारांनी (Sharad Pawar on Warkari Parishad) सांगितलं.

विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला जायचं असतं. माऊलींच्या दर्शनाला आळंदीला जायचं असतं. तुकोबांच्या दर्शनाला देहूला जायचं असतं, पण यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. त्यामुळे कोणी सांगितलं की तुम्हाला परवानगी नाही, तर त्यांना वारकरी संप्रदायाचे विचारच समजले नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला. सच्चा वारकरी अशी भूमिका कधीच घेणार नाही. म्हणून त्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. लहान सहान गोष्टी होत असतात. त्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. आपला मार्ग सोडायचा नसतो. बांधिलकी ठेवायची असते, तिथे तडजोड करायची नसते. त्याच भावनेने इथे आलो, असं पवारांनी स्पष्ट केलं.

जोग महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी शरद पवार आळंदीत आले होते. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते. राष्ट्रीय वारकरी परिषदेने हिंदू धर्मियांच्या कार्यक्रमाला शरद पवारांना आमंत्रित करु नये, अशी भूमिका घेतली होती. यावर अखंड महाराष्ट्रातील वारकऱ्यांसमोर पवार काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

‘मी इथे मनात कोणताही हेतू ठेवून आलेलो नाही. पंढरपूर, देहू, आळंदी, तुळजापूर अशा ठिकाणी मी नेहमी जातो. पण कोणतंही प्रदर्शन करण्याचा माझा हेतू नसतो. मी पंढरपूरला अनेकदा जाऊन आलो, ते कोणाला माहितही नसेल. कारण पहाटे चारला वगैरे मी येऊन गेलो. राजकारणात आम्ही आहोत म्हणजे अखंडपणे प्रसिद्धीशिवाय आम्हाला काही दिसत नाही, असा गैरसमज आहे. पण त्या गैरसमजाकडे मी जात नाही आणि जाऊ इच्छित नाही’ अशा शब्दात पवारांनी वारकरी परिषदेला सुनावलं.

शरद पवारांना धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नका, राष्ट्रीय वारकरी परिषदेचं फर्मान

‘आदिनाथांपासून संत निवृत्ती महाराजांपर्यंत एक परंपरा आहे, त्यांनी एक दिशा दाखवली. यात समन्वय कोणी साधला असेल तर ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. तेराव्या शतकापासून वारकरी परंपरा उदयास आली. या दरम्यान आपण मुघलांचं आक्रमण पाहिलं. ब्रिटिशांचे राज्य पाहिलं, अनेक हल्ले पाहिले. हे सर्व झालं खरं, पण वारकरी संप्रदायावर कोणी काही थोपवू शकलं नाही. कारण तुमची बांधिलकी महत्वाची ठरली’ असं म्हणता शरद पवारांनी वारकरी परंपरेचं कौतुक केलं.

‘इंद्रायणी शुद्ध करा ही तुमची पहिली मागणी आहे. मला यात लक्ष घालायला सांगितलं. पण मी मंत्री तर नाही, मग माझ्या हातात काय आहे?’ असा सवाल पवारांनी मिश्किलपणे विचारला. ‘पण ठीक आहे. वारकरी स्वतःसाठी काही मागत नाही, नदी स्वच्छ झाली तर समाजाचा फायदा आहे. मग ही मागणी पूर्ण झाली नाही तर हे सरकार काय कामाचं, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना सांगा. पुण्याच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी तर जास्त आहे, कारण ते उपमुख्यमंत्री आहेत. तुम्ही म्हणताय तर सांगतो त्यांना, असंही पवार हसत म्हणाले.

अखंड वारकरी संप्रदायाची ही मागणी पूर्ण करणे ही पवार कुटुंबियांची जबाबदारी आहे. एवढं सांगितल्यावर ते ऐकतील. बरं हे आश्वासन नव्हे, माझी जबाबदारी आहे, असं शरद पवारांनी सांगितलं. (Sharad Pawar on Warkari Parishad)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *