शिर्डी-पाथरी वाद चिघळण्याची चिन्हं, ग्रामस्थांची शिर्डी बंदची हाक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी 'पाथरी हे शिर्डीच्या साईंचं जन्मस्थळ' असा उल्लेख केल्याने वादाला फोडणी मिळाली. हा वाद जास्त चिघळण्याची शक्यता आहे. कारण शिर्डी ग्रामस्थांनी रविवारपासून शिर्डी बंदची हाक दिली आहे.

शिर्डी-पाथरी वाद चिघळण्याची चिन्हं, ग्रामस्थांची शिर्डी बंदची हाक

अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळावरुन नवा वाद उफाळला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात ‘साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या पाथरी गावाचा शंभर कोटींचा विकास आराखडा तयार आहे’ असे वक्तव्य केले होते. याच वक्तव्यावरुन शिर्डीकर आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) ‘पाथरी हे शिर्डीच्या साईंचं जन्मस्थळ’ असा उल्लेख केल्याने या वादाला फोडणी मिळाली. हा वाद जास्त चिघळण्याची शक्यता आहे. कारण शिर्डी ग्रामस्थांनी रविवारी शिर्डी बंदची हाक दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी बंदची हाक दिली आहे. गुरुवारी बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी शनिवारी ग्रामसभा घेण्यात येणार आहे. पाथरीच्या विकासाला विरोध नाही तर मुख्यमंत्र्यांकडून पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असल्याचा उल्लेख केला, त्याला विरोध असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

“साईबाबांनी आपल्या हयातीत आपले नाव, गाव, जात, धर्म उघड केले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी गावाचा उल्लेख साईबाबांच्या जन्मस्थळाशी करुन शिर्डीकर आणि भाविकांची नाराजी ओढवून घेतली. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी आणि व्यवसायिक फायद्यासाठी असा वाद काही जण उपस्थित करत आहेत. बाबांच्या नावावर कोणीही धंदा मांडू नये. अन्यथा शिर्डीकर मोठे आंदोलन उभारुन अशा षडयंत्री लोकांवर कारवाई करण्यासाठी भाग पाडतील”, असा इशारा साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे आणि ग्रामस्थांनी दिला आहे.

साईसमाधी शताब्दी सोहळ्यात राष्ट्रपतींनी साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख केला होता. यावर साईभक्त आणि शिर्डीकरांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, कमलाकर कोते यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिर्डीकरांनी दिल्लीत जाऊन थेट राष्ट्रपतींची भेट घेऊन जन्मस्थळाचा खुलासा केला होता. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा जन्मस्थळाचा उल्लेख केल्याने भाविक तसेच शिर्डीकरांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *