आदित्य ठाकरेंचा जन आशीर्वाद दौरा लवकरच

भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विकास यात्रेची घोषणा केली होती. त्यालाही शिवसेनेने फॉलो करत, आता आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात जन आशीर्वाद काढण्याचं नियोजन केलं आहे.

आदित्य ठाकरेंचा जन आशीर्वाद दौरा लवकरच

मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये सध्या मुख्यमंत्रीपदावरुन चांगलीच स्पर्धा रंगली आहे. मुख्यमंत्रीपदाचे लक्ष्य गाठण्याकरिता शिवसेनेनं भाजपच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने पक्षविस्तार आणि पक्ष बांधणीचा कार्यक्रम हाती घेतल्याने शिवसेनेनही पक्षबांधणी करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विकास यात्रेची घोषणा केली होती. त्यालाही शिवसेनेने फॉलो करत, आता आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात जन आशीर्वाद काढण्याचं नियोजन केलं आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस कोल्हापुरातून या यात्रेला सुरुवात होण्याचे संकेत आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी तीन महिने उरले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना चांगलीच कामाला लागली आहे. आधीच युतीत मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेने जोर धरला असतानाच, विधानसभेची पूर्वतयारी म्हणून शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात जन आशिर्वाद यात्रा काढणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीत जनसंवाद यात्रांची स्पर्धा रंगणार आहे.ि

शिवसेनेच्या माजी  नगरसेविका वैभवी चव्हाण यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचा कोलाज केलेला एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोवर “ज्यांनी मतं दिली,त्यांचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी दिली नाहीत, त्यांची मनं जिंकायची आहेत”, असे लिहीले आहे. तसेच या फोटोला ‘जन आशीर्वाद दौरा’ असे कॅप्शनही दिले आहे.

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर युतीत सध्या सकारात्मक वातावरण असलं तरी यंदा गाफील राहून चालणार नाही याची शिवसेना नेतृत्वाला पूर्ण कल्पना आहे. यासाठी 2014 विधानसभा निवडणुकीचा अनुभव पाठीशी आहे. भाजपकडून अचानक दगफटका होऊ शकेल या भीतीने शिवसेनेने 288 विधानसभा मतदारसंघाची तयारी करायचं ठरवलं आहे.

आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याला जुलै महिन्याच्या शेवटी सुरुवात होणार आहे. या दौऱ्याचे पहिले ठिकाण कोल्हापूर असू शकते.

दुसरीकडे भाजपने पुन्हा शिवशाहीचे सरकार असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वातील विकास दौऱ्याची घोषणा केली होती. येत्या ऑगस्ट महिन्यापासून महाराष्ट्रात भाजपचा विकास दौरा सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्याच्या विकास यात्रेच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या संभाव्य जन आशीर्वाद दौऱ्याला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *