शिवसेना पक्ष चिन्हाच्या सुनावणीबद्दल मोठी अपडेट, कोर्टात काय घडलं?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर ८ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, परंतु ही सुनावणी आता १२ आणि १३ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या अंतिम निर्णयानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल अपेक्षित आहेत.

Shivsena symbol dispute : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह या वादावर आज ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी पार पडणार होती. आजच्या सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करण्यास सुरुवात केली. आता ही सुनावणी येत्या १२ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.
आज शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली. शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करण्यास सुरुवात केली. सिब्बल यांनी जानेवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यामुळे या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी केली. मात्र दुसरे वकील वारंवार मध्यस्थी करत असल्याने सिब्बल यांनी त्यांना थांबवले. आधीच खूप वेळ गेलेला आहे, आता सुनावणी घ्या अशी मागणी केली.
युक्तिवादासाठी किमान ४५ मिनिटांचा वेळ
यावेळी कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादासाठी किमान ४५ मिनिटांचा वेळ मागितला. यानंतर न्यायालयाने येत्या १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद होईल असे सांगत आजची सुनावणी संपली, असे जाहीर केले. त्यामुळे आता या प्रकरणावर १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी अंतिम युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. यानंतर खरी शिवसेना कोणाची यावर अंतिम फैसला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
ॲड. असीम सरोदे काय म्हणाले?
आता यानंतर ॲड. असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली. आम्हाला फक्त ४५ मिनिटे हवी आहेत, तेवढी आम्हाला द्या, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले. त्यावेळी कोर्टात आम्ही महापालिका निवडणुका आहे, हे देखील सांगितलं. पण कोर्टाने महापालिका निवडणुका जानेवारीत आहेत, त्याआधी आपण ही सुनावणी निश्चित घेऊ, असे सांगत १२ नोव्हेंबर ही तारीख दिली आहे. ते १९ नोव्हेंबर ही तारीख देणार होते, पण त्यांनी आधीची तारीख दिली, अशी माहिती दिली.
येत्या १२ नोव्हेंबरला युक्तीवाद सुरु केला जाणार आहे. यात ठाकरे गटातर्फे कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद होईल. त्यानंतर इतर लोक युक्तीवाद करतील. आज कोर्टात १२ पासून सुनावणी घेऊ असे सांगितले आहे. यानुसार १२, १३ आणि १४ अशा तीन दिवसात सुनावणी होईल असाच त्याचा अर्थ आहे, असेही ॲड. असीम सरोदे म्हणाले.
