सांगलीमध्ये जयंत पाटलांकडून मुस्कटदाबी, शिवसेना नेत्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

संजय विभुते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सांगलीचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची तक्रार केली आहे.

सांगलीमध्ये जयंत पाटलांकडून मुस्कटदाबी, शिवसेना नेत्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

सांगली : महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असा दावा महाविकास आघाडीचे नेते वारंवार करत आहेत. परंतु स्थानिक पातळीवर एकमेकांमध्ये धुसफूस सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. सांगली जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सांगलीचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची तक्रार केली आहे. (Shivsena  Sanjay Vibhute Complaint To Cm Uddhav Thackeray About Jayant Patil)

जिल्ह्यात शिवसेना पक्षाला आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान दिले जाते, असा आरोप संजय विभुते यांनी केला आहे. तसंच जिल्ह्यात शिवसेनेचा एकमेव आमदार असून त्याचे देखील खचीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असाही गंभीर आरोप विभुते यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी आपलं सविस्तर म्हणणं मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी नुकतीच शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची ऑनलाईन बैठक घेतली. संघटनात्मक अनेक बाबींवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. यावेळी सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटलांकडून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न केला जातोय’, अशी तक्रार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती विभुते यांनी दिली.

सांगलीचे पालकमंत्री आणि राज्य सरकारचे मंत्री म्हणून जयंत पाटील पोलीस दलाला आणि प्रशासनाला हाताशी धरुन शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेली महाविकास आघाडी ही विरोधकांना दमवण्यासाठी आहे, त्यांच्या प्रश्नांना प्रत्युत्तर देण्यासाठी आहे. पण आमच्याकडे असणारी महाविकास आघाडी ही शिवसेनेला दाबण्यासाठी आहे की काय? असा प्रश्न आम्हाला पडला आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया विभुते यांनी व्यक्त केली आहे.

‘महाविकास आघाडीत अनेक मुद्द्यांवर समन्वयाची बैठक पार पडत असते. मात्र गेल्या महिन्यामध्ये एकही समन्वयाची बैठक झालेली नाही. शासकिय कमिट्यांमध्ये देखील शिवसेनेला विश्वासात घेतलं जात नाही, अशा अनेक व्यथा आम्ही उद्धव ठाकरेंसमोर मांडल्याचं’ विभुते यांनी सांगितलं.

दरम्यान, आम्ही मांडलेल्या व्यथांवर ‘आपण काही काळजी करु नका. यामध्ये आपण सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने तोडगा काढू’, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं विभुते यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांची सेना प्रमुखांशी ऑनलाईन बैठक

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 27 ऑक्टोबर रोजी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. रात्री 10 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधला.

(Shivsena  Sanjay Vibhute Complaint To Cm Uddhav Thackeray About Jayant Patil)

संबंधित बातम्या

घणाघाती भाषणानंतर बैठकांचं सत्र, उद्धव ठाकरेंनी जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली, आज रात्रीच संवाद साधणार

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची नाराजी दूर होईना, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *