
शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाडा विभागाच्या दगाबाज रे संवाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज उद्धव ठाकरेंनी बीड जिल्ह्यातील पाली गावात शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केवळ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवरही तीव्र टीका केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी सरकारवर घराघरात भांडण लावण्याचा गंभीर आरोप केला.
उद्धव ठाकरेंनी पाली गावातील शेतकरी महिलांना लाडकी बहीण योजेनेवर प्रश्न विचारले. या सभेला उपस्थित असलेल्या महिलांना थेट प्रश्न विचारत त्यांनी टीकेला सुरुवात केली. इथे अनेक महिला आल्या आहेत. मला त्यांना विचारायचं आहे की, ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ तुमच्यापैकी किती महिलांना मिळतो? निवडणुकीआधी घरातल्या सर्व महिलांना लाभ मिळाला होता का?” असा सवाल त्यांनी केला. यावर तिथे जमलेल्या महिलांनी हो म्हटल्यानंतर त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले.
आता सरकारने नवीन नियम काढला आहे. घरातील फक्त दोनच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. असे सांगितले जात आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की सध्याचे मुख्यमंत्री या योजनेच्या माध्यमातून घराघरात भांडणं लावत आहेत, असा गंभीर आरोप केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ‘जास्तीत जास्त अपत्य जन्माला घाला’ या विधानाचा संदर्भ देत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
मोहन भागवत म्हणतात जास्तीत जास्त अपत्य जन्माला घाला. मग, एका घरात जर सासू आणि दोन सुना असतील, आई आणि दोन मुली असतील किंवा चार बहिणी असतील, तर कोणाला लाभ द्यायचा? अशा परिस्थितीत घराघरात भांडणं लावली जात आहेत.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ज्या महिलेला या योजनेचा लाभ मिळतो, ती ‘लाडकी’ आणि जिला मिळत नाही, ती ‘नावडती’ ठरवली जात आहे. राज्यकर्ते असे असू शकत नाहीत. राज्यकर्ते हे सर्वांना समान न्याय देणारे हवेत, अशा शब्दांत त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले.
दरम्यान ‘दगाबाज रे संवाद’ या दौऱ्यातून उद्धव ठाकरे हे सध्या राज्यातील विविध प्रश्नांवर थेट जनतेशी संवाद साधून शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल करत आहेत. पाली येथील सभेत त्यांनी लाडकी बहीण योजनेचा मुद्दा उपस्थित करून महिला मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला आहे.