4 जूनला मान्सून केरळमध्ये, ‘स्कायमेट’चा अंदाज

4 जूनला मान्सून केरळमध्ये, 'स्कायमेट'चा अंदाज

मुंबई : भारतात सर्वसाधारण वेळेतच मान्सून दाखल होणार आहे. येत्या 4 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल, असे स्कायमेट संस्थेने (Skymet Weather) अंदाज वर्तवला आहे. त्याआधी, 22 मे रोजी म्हणजे आठवड्याभरातच अंदमानमध्ये मान्सून येईल.

स्कायमेटने काय अंदाज वर्तवला आहे?

भारतात सर्वात आधी अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून दाखल होतो. साधारण 20 मेच्या दरम्यान अंदमान, निकोबार बेटांवर मान्सूद दाखल होतो. मात्र, यंदा 22 मे रोजी अंदमान बेटावर मान्सून दाखल होईल. म्हणजेच, यंदा मान्सून दाखल होण्यास दोन दिवस उशीर होईल, असे एकंदरीत स्कायमेटच्या अंदाजावरुन लक्षात येते.

अंदमानमध्ये 22 मे रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर, 4 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल. केरळमध्येही मान्सून दाखल होण्यास दोन दिवसांचा उशीर होणार आहे. मात्र, मान्सून दाखल होण्याआधीच केरळमध्ये पूर्व-मान्सून होईल. त्यानंतर ईशान्य भारतातही मान्सून दाखल होईल, असेही स्कायमेटने म्हटलंय.

कुठे कसा मान्सून राहील?

“2019 मध्ये भारतातील चारही क्षेत्रात मान्सूनचा प्रभाव कमी राहील. पूर्व आणि ईशान्य भारतात, तसेच मध्य भारतातही कमी मान्सूनची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम आणि दक्षिण भारतात मात्र मान्सून चांगला राहील.”, असे स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह म्हणाले. तसेच, केरळमध्ये 4 जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातीला मान्सूनचा जोर कमी राहील, असेही जतीन सिंह यांनी सांगितले.

स्कायमेटने याआधी काय म्हटलं होतं?

याआधी म्हणजे 3 एप्रिल 2019 रोजी सुद्ध स्कायमेटने मान्सूनचा अंदाज वर्तवला होता. 2019 मध्ये 93 टक्के मान्सूनचा अंदाज स्कायमेटने एप्रिलमध्ये वर्तवला होता. यामध्ये जून ते सप्टेंबर या दरम्यान सरासरी 887 मिमी मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

भारतीय हवामान विभागाने काय अंदाज वर्तवला होता?

भारतीय हवामान विभागाने अर्थात आयएमडीने (India Meteorological Department) गेल्या महिन्यात म्हणजेच 15 एप्रिल रोजी मान्सूनचा अंदाज वर्तवून, शेतकऱ्यांना खुशखबर दिली होती. यंदा मान्सून सामान्य राहील अशी माहिती हवामान खात्याने दिली होती. सरासरीच्या 96 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता – 39 टक्के, सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता – 10 टक्के, अतिवृष्टी होण्याची शक्यता – 2 टक्के सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता – 33 टक्के आणि अत्यंत कमी (टंचाईसदृश परिस्थिती) पावसाची शक्यता – 17 टक्के वर्तवण्यात आली आहे.

गेल्या वर्षी काय स्थिती होती?

भारतात 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं. गेल्या वर्षी 2018 मध्ये जुलै, सप्टेंबर महिन्यात पावसाची सरासरी 91 टक्के होती. हवामान विभागाने 97 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे अनेक भागात दुष्काळाचं चित्र आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तर हे भयाण चित्र पाहायला मिळतं.