'नाणार'ऐवजी रायगडमध्ये रिफायनरी प्रकल्प होणार?

रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर प्रस्तावित नाणार प्रकल्प हलवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नाणारमध्ये प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. त्यात शिवसेनेने जोरदार विरोध केल्याने, अखेर नाणारमधील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प रायगड जिल्ह्यातील एमआयडीसीच्या जागेवर आणण्याचा विचार सुरु झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाला गेल्या काही वर्षात स्थानिकांसह शिवसेना …

'नाणार'ऐवजी रायगडमध्ये रिफायनरी प्रकल्प होणार?

रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर प्रस्तावित नाणार प्रकल्प हलवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नाणारमध्ये प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. त्यात शिवसेनेने जोरदार विरोध केल्याने, अखेर नाणारमधील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प रायगड जिल्ह्यातील एमआयडीसीच्या जागेवर आणण्याचा विचार सुरु झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाणार रिफायनरी प्रकल्पाला गेल्या काही वर्षात स्थानिकांसह शिवसेना आणि इतर राजकीय पक्षांनी जोरदार विरोध केला आहे. नाणार विरोधी कृती समितीने तर अधिवेशन काळात मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या मांडला होता. तरीही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर हा प्रकल्प नाणारमधून हलवण्यावर विचार सुरु झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मात्र, आता रायगडमध्ये हा रिफायनरी प्रकल्प आणला जाणार असल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे रायगडमध्ये या रिफायनरी प्रकल्पाचे स्वागत होते की विरोध होतो, हे येणाऱ्या काळातच कळेल.

नाणार रिफायनरी प्रकल्प नेमका काय आहे?

कोकणातील निसर्गसंपन्न अशा रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या सीमेवर नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प प्रस्तावित आहे. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 14 गावं आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील 2 गावांमध्ये प्रकल्पाचा विस्तार आहे. 13000 एकरावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. नागरिकांचा विरोध असतानाही, या गावांमधील क्षेत्र 18 मे 2017 रोजी आद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं आहे.

हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या नाणार रिफायनरी प्रकल्प उभारत असून, त्यांची संयुक्तपणे रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेड म्हणजेच RRPCL कंपनी 22 सप्टेंबर 2017 रोजी स्थापन करण्यात आली.

काही महिन्यांपूर्वीच सौदी अरेबियाच्या आरामको कंपनीशी नाणार रिफायनरीबाबत करार झाला. नाणार रिफायनरीच्या उभारणीला तीन लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आशियातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत असून, 2023 पर्यंत हा प्रकल्प कार्यन्वित करण्याचा सरकारचा विचार आहे.

आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पापासून अवघ्या 15-16 किलोमीटरच्या अंतरावर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *