कलेला आधुनिकतेची जोड देत मातीचं सोनं केलं, रसिका दळींच्या मातीच्या भांड्यांना दुबईतून मागणी

कोकणची अस्सल लाल माती आणि जोडीला कर्नाटक, वाराणसी मधील चिवट मातीचा वापर करत 50 हून अधिक विविध प्रकारच्या भांड्यांची निर्मिती रसिका दळवी यांनी स्थानिक महिलांच्या मदतीने केली.

कलेला आधुनिकतेची जोड देत मातीचं सोनं केलं, रसिका दळींच्या मातीच्या भांड्यांना दुबईतून मागणी

रत्नागिरी : एक काळ होता, जेव्हा मानव दैनंदिन आयुष्यात मातीच्या भांड्यांचा (Clay Utensils) मोठ्या प्रमाणात वापरत करत असे. मात्र, जसजसा काळ बदलत गेला तशा माणसाच्या गरजा आणि आवड देखील बदलत गेली. मातीच्या चुलीची जागा गॅस आणि इलेक्ट्रॉनिक शेगडीने घेतली. तर घरच्या मातीच्या तसेच, तांब्याच्या भांड्यांची जागा प्लास्टिक प्लेट्स आणि काचेसह अन्य नक्षीदार भांड्यांनी घेतली. परिणामी मातीची आणि तांब्याची भांडी कालबाह्य होण्याच्या मार्गी लागली. त्याच कालबाह्य होत असलेल्या मातीच्या भांड्याना आधुनिक तंत्राची जोड देत विविध प्रकारची नक्षीदारी आणि भन्नाट आकाराची भांडी बनवण्याचा यशस्वी प्रयोग एका महिलेने केला आहे. या महिलेने तंत्रज्ञानाने समृद्ध झालेल्या माणसाला पुन्हा मातीची ओढ लावण्याची किमया केली आहे. ती महिला म्हणजे गुहागरमधील धोपावे गावातील रसिका दळी. कलेला आधुनिकतेची जोड देत मातीचं देखील सोनं करण्याची किमया त्यांनी करुन दाखवली आहे (Clay Utensils Guhagar).

कोकणची अस्सल लाल माती आणि जोडीला कर्नाटक, वाराणसी मधील चिवट मातीचा वापर करत 50 हून अधिक विविध प्रकारच्या भांड्यांची निर्मिती रसिका दळवी यांनी स्थानिक महिलांच्या मदतीने केली. गेल्या दोन वर्षांपासून त्या हे काम करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी तयार केलेल्या मातीच्या भांड्यांना आता दुबई, कतार आणि इतर देशांतूनही मागणी वाढू लागली आहे. सुरवातीला घाबरत घाबरत सुरू केलेल्या या व्यवसायाला आता देश-विदेशातून मागणी येऊ लागल्यामुळे महाराष्ट्रातल्या या पहिल्या वहिल्या प्रायोगाच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दोन वर्षांपूर्वी एका छोट्या खोलीत सुरु केलेल्या या उद्योगाला आता देश-विदेशातून मिळणाऱ्या वाढत्या मागणीमुळे नवी उभारी मिळाली आहे. परिणामी धोपावे सारख्या अत्यंत ग्रामीण भागातल्या महिलांनाही नियमित रोजगार उपलब्ध झाला आहे. ज्यामुळे इथल्या महिलांच्या जगण्याला नवी दिशा मिळाली आहे.

मातीची भांडी बनवण्याची पद्धत सोपी असल्यामुळे धोपावे गावातल्या महिलांनी ही कला कमी वेळात आत्मसात केली आणि त्यामुळे दळी यांच्या कामाला आणखी गती मिळाली. मातीचे कोणतेही भांडे, कच्च्या मातीपासून ते अगदी भट्टीमध्ये जाईपर्यंतची सर्व प्रक्रिया दळी यांनी आधी स्वतः आत्मसात केली आणि त्यानंतर त्यांनी गावातल्या महिलांना त्याबाबतचे प्रशिक्षण दिले. यातूनच आज 40 ते 50 महिलांना हक्काचं काम मिळालं आहे.

मागील काही काळात देशासह राज्यात शिक्षणासह उद्योगातही महिला यशस्वीपणे पुढे जाताना आपल्याला विविध माध्यमातून पाहायला मिळत आहे. असं असताना आता उद्योगात ग्रामीण भागातल्या महिलाही पिछाडीवर नाहीत याचा पुरावा धोपवे येथील महिला उद्योन्मुख महिला उद्योजक रसिका दळवी यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं आहे.