सुमित वाघमारे कुटुंबीयांचं आंदोलन, प्रमुख चार मागण्या

  • Updated On - 4:47 pm, Fri, 5 July 19
सुमित वाघमारे कुटुंबीयांचं आंदोलन, प्रमुख चार मागण्या

बीड: सुमित वाघमारे खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी वाघमारे कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. बहिणीने विरोधात जाऊन लग्न केल्याने भावांनी तिच्या पतीची भर रस्त्यात हत्या केली. 18 डिसेंबरच्या या हत्याकांडामुळे राज्यभर खळबळ उडाली. सर्व आरोपींना 25 डिसेंबरला मुसक्या आवळल्या. यानंतर सुमितची पत्नी भाग्यश्री वाघमारे यांनी हत्या करणाऱ्या भावाला फाशी देण्याची मागणी केली आहे. तसंच वडील आणि नातेवाईंकानाही अटक करण्याची मागणी भाग्यश्री यांनी केली.

वाघमारे कुटुंबाचं आंदोलन

दरम्यान, वाघमारे कुटुंबीयाने आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. आरोपींना फाशी द्यावी, तक्रार न घेणारा पोलीस अधिकारी शिवलाल पुरबे यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणाऱ्या आदित्य शिक्षण संस्थेवर कठोर कारवाई करण्यात यावी,  शिवाय मयत सुमितची पत्नी भाग्यश्री यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, या मागणीसह सुमित वाघमारे यांचं संपूर्ण कुटुंब जिल्हाधिकारी कचेरीसमोर आंदोलनाला बसले.

संपूर्ण घटना काय आहे?

भाग्यश्री लांडगे आणि सुमित वाघमारे हे दोघेजण बीडच्या आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. दोघांची घट्ट मैत्री जमली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ घेऊन या दोघांनी लग्न केलं. मात्र, हे लग्न भाग्यश्रीच्या कुटुंबीयांना खटकलं. दोन महिन्यांपासून या प्रेमी जोडप्याचा शोध सुरु होता आणि  18 डिसेंबरचा दिवस त्यांच्यासाठी काळ बनून आला. भाग्यश्रीच्या भावाने म्हणजे बालाजी लांडगेने मित्रांच्या मदतीने सुमित वाघमारेची भररस्त्यात धारदार शस्त्राने हत्या केली.

18 डिसेंबरला सुमित आणि भाग्यश्रीची परीक्षा होती. पेपर संपवून ते संध्याकाळी पाच वाजता आदित्य महाविद्यालयाच्या बाहेर पडले. मात्र, तिथेच भाग्यश्रीचा भाऊ आणि त्याचे दोन मित्र काळ बनून बसले होते. याची पुसटशी कल्पना सुद्धा भाग्यश्री आणि सुमितला नव्हती. महाविद्यालयाच्या बाहेरच अचानक हल्ला झाला आणि यात सुमित गंभीर जखमी झाला. सुमित रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना, पत्नी भाग्यश्री मोठ्या आकांतेने पतीला वाचावा म्हणून आक्रोश करत होती, गयावया करत होती. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या एकाचेही काळीज पाझरले नाही. इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या संवेदना मेलेल्या होत्या. याउलट निर्लज्जपणे डोळ्यांनी पाहत ती घटना मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होते. शेवटी एक रिक्षाचालक पुढे आला आणि सुमितला रिक्षात टाकून बीडच्या जिल्हा रुग्णालयात नेण्याचं धाडस केलं. मात्र रस्त्यातच सुमितची प्राणज्योत मालवली.

आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाहेरच हे हत्याकांड घडलं. जेव्हा सुमितवर हल्ला झाला, तेव्हा त्याला वाचवण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही, एवढेच नव्हे, तर आदित्य महाविद्यालयाच्या वॉचमनने महाविद्यालयाचे गेट बंद केल्याचा आरोप सुमितच्या नातेवाईकांनी केला आहे.

या घटनेनंतर बीड पोलीस काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत मात्र हे सर्व मारेकरी तेथून पसार झाले होते. मारेकऱ्यांना अटक करा, यासाठी मध्यरात्रीपर्यंत बीडच्या शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

संबंधित बातम्या 

सुमित वाघमारे हत्या : प्रेम, लग्न, हत्या आणि अटक… संपूर्ण घटनाक्रम 

अखेर सुमित वाघमारेचे मारेकरी पोलिसांच्या जाळ्यात