मंदिराचा पैसा पाण्यासाठी वापरला, तरी पाणी नाही!

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात जंगली तांडा येथील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी चक्क देवाचा पैसा वापरावा लागला. पण त्यांच्या नशिबात पाणी काही मिळाले नाही. दोन महिन्यांपासून पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी मंदिरातील दानपेटीतून जमा झालेला पैसा विहीर खोदण्यासाठी वापरला. गावकऱ्यांनी विहीर खोदली, पण पाणी काही लागलेच नाही. भीषण अशी दुष्काळ परिस्थिती सध्या या गावात निर्माण …

मंदिराचा पैसा पाण्यासाठी वापरला, तरी पाणी नाही!

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात जंगली तांडा येथील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी चक्क देवाचा पैसा वापरावा लागला. पण त्यांच्या नशिबात पाणी काही मिळाले नाही. दोन महिन्यांपासून पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी मंदिरातील दानपेटीतून जमा झालेला पैसा विहीर खोदण्यासाठी वापरला. गावकऱ्यांनी विहीर खोदली, पण पाणी काही लागलेच नाही. भीषण अशी दुष्काळ परिस्थिती सध्या या गावात निर्माण झाली.

गावात गेल्या सात वर्षापासून सरकारचे एक ग्लासही पाणी मिळालेले नाही. सरकारने पाच वर्षांपूर्वी 80 लाख खर्च करून पाणी योजना राबवली, पण ती अर्धवट पडली. पाण्यासाठी गावात 35 खाजगी बोअर आहेत, पण एकही बोअर चालू नाही. अशी परिस्थिती जंगली तांडा गावाची आहे.

गावातल्या लोकांना पाणी हवे असेल, तर त्यांना विकत पाणी घ्यावं लागतं किंवा चार ते पाच किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावं लागत. गावात येणाऱ्या टँकरमधून 40 रुपयाला पाच लीटर पाणी गावकऱ्यांना विकत घ्यावे लागतं. यामुळे गावकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. पाणी नसल्यामुळे जनावरांचेही हाल होत आहेत. इतकी भीषण परिस्थिती असतानाही सरकारकडून एकही टँकर दिले जात नाही.

राज्यातील अनेक गावात सध्या मोठ्या प्रमाणात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकतेच नाशिकमध्ये पाण्याअभावी गायींचा मृत्यू झाला. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी सरकारकडून दुष्काळी गावांकडे दुर्लक्ष केलं जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *