‘मेहबूब शेख यांच्या उपस्थितीवर हरकत घेणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी समोर यावं, चांगलाच धडा शिकवू’, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचं आव्हान

कल्याणमध्ये मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीत कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 20 नगरसेवक असतील, असा दावा मेहबूब शेख यांनी केला (NCP leader Mehboob Shaikh participate in Kalyan NCP Program).

  • अमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण
  • Published On - 22:55 PM, 24 Jan 2021
'मेहबूब शेख यांच्या उपस्थितीवर हरकत घेणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी समोर यावं, चांगलाच धडा शिकवू', राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचं आव्हान

कल्याण (ठाणे) : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना कल्याणमधील कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी करणारं पत्र भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात देण्यात आलं होतं. याशिवाय मेहबूब शेख यांना परवानगी दिल्यास आंदोलन करु, असा इशारा भाजपने दिला होता. मात्र, तरीदेखील आज (24 जानेवारी) कल्याणमध्ये मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात “मेहबूब शेख यांच्या उपस्थितीवर हरकत घेणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी समोर यावं, चांगलाच धडा शिकवू”, असा इशारा कल्याण डोंबिवली राष्ट्रवादीचे युवाध्यक्ष सूधीर पाटील यांनी दिला (NCP leader Mehboob Shaikh participate in Kalyan NCP Program).

कल्याण पश्चिमेतील भानूसागर सिनेमा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी स्वप्नील रोकडे यांच्या वतीने रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. रविवारी संध्याकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मेहबूब शेख हे उपस्थित राहणार असल्याने भाजप युवा मोर्चाकडून कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना पत्र देण्यात आले होते. या पत्रात “मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यांनी जामीन घेतला आहे का? त्यांना असे मेळावे घेता येऊ शकतात का? त्यांना मेळाव्यास उपस्थित राहण्याची परवानगी देऊ नये”, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती.

दरम्यान, कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन कल्याण डोंबिवली राष्ट्रवादीचे युवाध्यक्ष सूधीर पाटील यांनी भाजपला समोर येण्याचं आव्हान दिलं. “भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात पत्र देऊन हरकत घेतली आहे. त्यांनी समोर रस्त्यावर यावे. त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकविला असता”, असं सूधीर पाटील म्हणाले (NCP leader Mehboob Shaikh participate in Kalyan NCP Program).

केडीएमसीत मागच्या वेळी राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक निवडून आले होते. आता 20 नगरसेवक निवडून येणार, असा विश्वास मेहबूब शेख यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांना भाजपॉ-मनसेच्या युतीवरबाबत प्रश्न विचारला असता भाजपने कोणासोबतही युती केली तरी त्याचा महाविकास आघाडीला काही फरक पडणार नाही, असं शेख यांनी नमूद केलं.

हेही वाचा : Photos : अजित पवारांच्या जनता दरबारात एक भेट आणि काम फत्ते