बूट की सॉक्स? पार्थ पवार यांच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमागील सत्य

बूट की सॉक्स? पार्थ पवार यांच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमागील सत्य

मुंबई : राष्ट्रवादीचे मावळचे उमेदवार पार्थ पवार यांना सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल करण्यात येत आहे. यावेळी ट्रोलिंगचे कारण आहे पार्थ यांचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक फोटो. पार्थ यांनी बूट घालून गणपती मंदिरात हार अर्पण केल्याचा दावा या फोटोद्वारे करण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने याचे खंडन करत ते बूट नसून सॉक्स असल्याचे स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीचे मावळचे उमेदवार पार्थ पवार कर्जतमध्ये गेले असताना त्यांनी गणपती मंदिरात दर्शन घेत हार अर्पण केला होता. त्यावेळचा हा फोटो असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या व्हायरल फोटोची कोणतीही शाहनिशा न करता विरोधकांकडून पार्थ यांना लक्ष्य करण्यात आले. पार्थ पवार यांनी बूट घालून हार घातल्याने हिंदुत्ववादी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रमुख आनंद दवे यांनी केली होती.

नाशिकमधील महंत अनिकेत शास्त्री (पिठाधिश्वर) यांनी तर पार्थ पवार यांना थेट धर्माचे राजकारण करु नका, असाच सल्ला दिला होता. अनिकेत शास्त्री म्हणाले होते, ‘आपण जर का धर्माचे रक्षण केले, तर धर्म आपले रक्षण करेल. हे शास्त्रवचन आहे, पण पार्थ पवार यांचा सोशल मीडियाद्वारे आमच्यापर्यंत आलेला फोटो पाहून आमच्यासारख्या संतांना अत्यंत वाईट वाटले. पायामध्ये पादत्राणे घालून ते गणपती बाप्पाला हार वाहणाऱ्या पार्थ यांना सदबुद्धी देवो हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. पवारांना एकच सांगणे आहे, की राजकारणामध्ये धर्म असावा, पण धर्माचा राजकारण करू नका.’

राष्ट्रवादीचं टीव्ही9 कडे स्पष्टीकरण

संबंधित फोटो व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीने टीव्ही9 मराठीला याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार पार्थ पवार यांच्या पायात हार अर्पण करताना बूट नसून सॉक्स आहेत. ते सॉक्स बुटांसारखे भासत असल्याचा फायदा घेऊन विरोधकांनी ही बदनामी केल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे एवढ्या सर्व प्रतिक्रियांनंतर ज्या कारणांसाठी पार्थ पवार यांना ट्रोल करण्यात आले, ते खोटे असल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *