Maharashtra Breaking News LIVE 02 October 2024 : मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 02 ऑक्टोबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहे. महाविकासआघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर काही पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. तर सध्या अनेक पक्षांतंर्गत बैठकाही होत आहेत. तसेच सध्या महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. गुजरातमधील चक्रीय स्थितीमुळे राज्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल, अशीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
सांगली महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीचा अपघात
सांगली : सांगली महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. सांगली शहरातील गव्हर्मेंट कॉलनीत गुप्ता यांची शासकीय गाडी एका खांबाला धडकली. आयुक्त शुभम गुप्ता यांना डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर मिरज येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
-
अजित पवार उद्या बारामतीत पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार
पुणे : कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी अजित पवार उद्या बारामतीत पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसात बारामतीत घडलेल्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आढावा घेणार आहेत. दरम्यान, बारामतीतल्या कायदा सुव्यवस्थेसंदर्भात योगेंद्र पवारांनी पोलिसांना पत्र लिहिलं होते.
-
-
प्रशांत किशोर यांच्या पक्षाचं नाव जन सुराज पार्टी
प्रशांत किशोर यांच्या पक्षाचे नाव जन सुराज पार्टी असेल. प्रशांत किशोर यांनी सांगितले की, जन सुराज पार्टी हे नाव निवडणूक आयोगाने अधिकृतपणे स्वीकारले आहे. ते म्हणाले की, आमच्या रॅलीत हिंदू, मुस्लिम, पुढारलेले आणि मागासलेले सगळे आले आहेत.
-
बिहारमधील मुझफ्फरपूर येथे हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले
बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. औरई नया गाव प्रभाग 13 मध्ये हा अपघात झाला. हेलिकॉप्टर पूर मदत कार्यात गुंतले होते आणि सीतामढी येथून मदत वाटप करून परतत होते. हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे चार जवान होते आणि सर्वजण सुरक्षित आहेत.
-
झारखंड: रेल्वे ट्रॅक स्फोटकांनी उडवला, पोलीस तपास सुरू
झारखंडमधील साहिबगंजमध्ये स्फोटकांचा वापर करून रेल्वे ट्रॅक उडवल्याची घटना समोर आली आहे. येथे स्फोटकांनी रेल्वे ट्रॅक उडवून लावला. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. लालमाटिया ते फरक्का या एमजीआर रेल्वे मार्गावर ही घटना घडली. अपघातानंतर या मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मात्र, या स्फोटात कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.
-
-
पाकिस्तान : बलुचिस्तानमध्ये 6 दहशतवादी ठार
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या दहशतवाद्यांवर सुरक्षा दल आणि निरपराध लोकांवर थेट हल्ले केल्याचा आरोप होता.
-
अज्ञात इस्माकडून जीवे मारण्याची धमकी
मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन आला आहे. भुजबळ यांना अज्ञात इस्माकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भुजबळ यांना मेसेज आणि फोनद्वारे ही धमकी देण्यात आली. अंबड पोलिसांनी अज्ञात इस्माविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. याआधीही छगन भुजबळ यांना धमीकचे फोन आले होते.
-
अस्पृश्यता संपवण्यात सावरकरांचे मोठे प्रयत्न : सुशीलकुमार शिंदे
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदें यांनी त्यांच्या राजकीय आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं कौतुक केल आहे. अस्पृश्यता संपवण्यात सावरकरांचे मोठे प्रयत्न असल्याचा उललेख शिंदे यांनी त्यांच्या या आत्मचरित्रात केल आहे. तसेच प्रदीर्घ काळ राजकारणात काम केल्यानंतर मला वाटतं की, काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडवू आणण्याची गरज असल्याचंही शिंदे यांनी म्हटलंय.
-
शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या काही तरुणांच्या तोंडाला फासलं काळं
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने दापोलीतील हिंदू समाज आक्रमक झाला आहे. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या काही तरुणांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं आहे. काही लोकांनी छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह गाण्यावर नाचत धिंगाणा घातला. या नाचाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शिवप्रेमींनी त्या तरुणांना माफी मागायला लावत तोंडाला काळं फासलं आहे. तसेच मराठा समाजातील संतप्त नागरिकांनी पोलिसांमध्ये तक्रार देत शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
-
रिफायनरी विरोधातील आंदोलकांवरील गुन्हे सरसकट माफ करावेत – भास्कर जाधव
कोकणातील रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे.निवडणुकीत आंदोलनकर्त्यांना फसवलं जाणार नाही याचा विचार आंदोलनकर्त्यांनी करावा असेही ते म्हणाले.
-
सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार आमने-सामने
राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार एका कार्यक्रमात समोरासमोर आले, तेव्हा युगेंद्र पवारा यांनी नमस्कार करीत काकी सुनेत्रा पवार यांचे आशीर्वाद घेतले.
-
गोविंदा गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवले
गोविंदा गोळीबार प्रकरणी पोलिसांनी गोविंदाची मुलगी आणि अंगरक्षकाचे जबाब नोंदवले आहेत.गोविंदाच्या डिस्चार्जनंतर त्यांचाही पोलिस जबाब नोंदवणार आहेत.
-
मंत्री हसन मुश्रीफ यांचा रोहित पवारांवर हल्लबोल
कोल्हापूर- मंत्री हसन मुश्रीफ यांनी रोहित पवारांवर हल्लबोल केला. “रोहित पवार अजित पवारांची स्पेस घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र असं स्थान मिळण्यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात. रोहित पवारांनी आपल्या वयाचं भान ठेऊन बोलावं,” असा सल्ला हसन मुश्रीफ यांनी दिला.
-
अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचं महिलांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य
अमरावती- अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय. “मुलगी जर पाहायला चांगली असेल तर ती तुमच्या माझ्यासारख्याले भेटणं नाही, ती नोकरीवाल्या मुलाला भेटते. दोन नंबरची मुलगी डोंबली मुलगी पानटपरी वाल्याला किराणा दुकानदाराला भेटते. तीन नंबरचा गाळ जो राहला सूहला हेबडली हाबडली जी पोरगी आहे ती शेतकऱ्याच्या पोट्टला भेटते. म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं खरं राहलं नाही. जन्माला येणार जे लेकरू आहे ते हेबाळ निघत राहते..माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वाणराचे पिल्लू असाच कार्यक्रम आहे सगळा,” असं ते म्हणाले.
-
कांदा अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचा राज्य सरकारला इशारा
नाशिक- कांदा अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. राज्य सरकारने घोषित केलेल्या कांदा अनुदानापासून शेतकरी वंचित आहे. राज्यात तेरा हजार शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत अनुदानाचा एकही रुपया मिळाला नाही, असं कांदा उत्पादक संघटनेनं म्हटलंय. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करावी अशी मागणी भारत दिघोळे यांनी केली. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही कांदा उत्पादक शेतकरी सत्ताधाऱ्यांना मतदानातून उत्तर देईल, असा इशारा भारत दिघोळे यांनी दिला.
-
महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत- राज ठाकरे
‘आज महात्मा गांधींची जयंती. ‘बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला’, असं गांधीजी म्हणायचे. त्यांच्या या म्हणण्यातला ‘मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर….’ याचा खोल अर्थ मात्र हल्ली समजेनासा झाला आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीवर कुठलाही विचार पूर्ण व्हायच्या आत व्यक्त व्हायचं,हे सध्या सुरु आहे. आणि महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत. काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहित झाल्यामुळे, असल्यांचा सुळसुळाट झाला आहे. आणि हे होतंय कारण माध्यमं यांना प्रसिद्धी देतात. आणि त्यात भर पुन्हा सोशल मीडियाची,’ असं ट्विट करत राज ठाकरेंनी टोला लगावला आहे.
-
धुळे महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक
धुळे महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाली आहे. उबाठा शिवसेनेच्या वतीने धुळे महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. अकराशे कोटींच्या निधीमध्ये भ्रष्टाचार केल्याच्या आरोप करत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी श्राद्ध घातलंय. धुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजप नेत्यांचं श्राद्ध घालण्यात आलंय. महापालिकेत विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार करून भाजपची विधानसभेची तयारी सुरू, असा आरोप संतप्त शिवसैनिकांनी केला आहे.
-
नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावातील धक्कादायक घटना आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे.
-
शिवसेना शिंदे गटाचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी घेतली खासदार सुप्रिया सुळे यांची भेट
शिवसेना शिंदे गटाचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. सोमेश क्षीरसागर हे शिवसेना शिंदे गटाचे मोहोळचे नेते असून राष्ट्रवादी अजितदादा गटाचे माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत.
मागील अनेक विधानसभा निवडणुका लढवल्या असून यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यापूर्वी देखील सोमेश क्षीरसागर यांनी शरद पवार तसेच जयंत पाटलांची भेट घेतली आहे.
-
पक्ष फोडून मित्र मिळवणारे 2029 ला सत्तेत कसे येतील? जयंत पाटील
जे पक्ष फोडून मित्र बनले, त्यांचा आधार घेण्याची वेळ 2024 मध्ये भाजपवर आली. तो पक्ष 2029 ला सत्तेत कसा येईल? आता कमळाची परिस्थिती गंभीर आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले
-
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड, एका पोलिसाचं निलंबन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर महिलेने तोडफोड केल्याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी एका पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे. पोलीस हवालदार अनिल आवळेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
-
अमित शहांच्या दौऱ्यावरून मार्मिक चे व्यंगचित्र, भाजप नेत्यांना केलं लक्ष्य
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून मार्मिकच्या व्यंगचित्रातून त्यावर भाष्य करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याचा मुद्दा, हाय प्रोफाईल अपघात प्रकरण, बदलापूर अत्याचार प्रकरण, मुंबईतील रस्ते इत्यादी मुद्द्यांवरून व्यंगचित्रांच्या मार्फत भाजप नेत्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
-
मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंकडून दिल्लीत लोटांगण – प्रतापराव जाधव यांची टीका
मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत छोट्या-छोट्या नेत्यांसमोर लोटांगण घालत आहेत, अशी टीका प्रतापराव जाधव यांनी केली आहे. बाळासाहेबांनी कधी मातोश्री सोडली नाही. आमच्या पक्षातील कोणीही मुख्यमंत्रीपदासाठी उंबरठे झिजवले नाहीत, असेही ते म्हणाले.
-
Maharashtra News: मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव भाजपच्या विद्यमान आमदाराच्या विरोधात मैदानात
परिवर्तन रॅली काढत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या शक्तीने निवडणुक लढवण्याची केली घोषणा… ज्याप्रमाणे फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार विजयी झाले त्याप्रमाणेच मुख्यमंत्र्यांच्या शक्तीने मी सुद्धा निवडणूक येणार – बालाजी खतगावकर , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव
-
आंबेप्रेमींसाठी आनंदाची बातमी
आंबा खवय्यांसाठीची बातमी आहे. ऑक्टोबरमहिन्यात पाऊस न झाल्यास यावर्षीचा आंबा वेळेत येणार आहे. 15 आँक्टोबरपर्यत पाऊस पडत राहिला तर आंब्याचे गणित बिघडणार आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्यावर आंब्याचे बरेसचे गणित अवलंबून आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
-
पोलिसांनी गोविंदाचा जबाब नोंदवला
अभिनेता गोविंदाचा मुंबई पोलिसांनी काल जबाब नोंदवला. गोविंदाकडून काल पहाटे स्वतच्याच पिस्तूलमधून मिसफायरींग झालं होतं. सध्या गोविंदा जुहूतल्या क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल असून उपचार सुरू आहेत. गोविंदाच्या घरी कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात आला.
-
अपघातग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे प्रवास करणार होते
पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. याच हेलिकॉप्टरने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते.
-
धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळलं
पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा यात मृत्यू झाला आहे.
-
आज भाजपची निवडणूक नियोजन बैठक
नागपूर शहर भाजपची आज निवडणूक नियोजन बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि नागपूर जिल्हा प्रभारी कैलास विजयवर्गीय उपस्थित राहतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या सूचनांवर या बैठकीत मंथन होणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी नागपूरच्या सुरेश भट सभागृहात संध्याकाळी ही बैठक होणार आहे. बैठकीला शहर पदाधिकारी,मंडळ अध्यक्ष,शक्तिकेंद्र प्रमुख यांचा समावेश राहणार आहे.
-
पूरग्रस्त राज्यांसाठी केंद्राची मदत
देशातील पूरग्रस्त राज्यांसाठी केंद्र सरकारने मोठी मदत जाहीर केली आहे. 5850 कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून मंजूर केले आहेत. महाराष्ट्रासाठी 1492 कोटी , आंध्र प्रदेश साठी 1 हजार कोटी, गुजरात साठी 600 कोटी, तेलंगणासाठी 417 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. देशभरातील 21 राज्यांसाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला आहे.
-
Maharashtra News Live : धाराशिवमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष देणार उमेदवार, लवकरच जाहीर करणार नावे
धाराशिव जिल्हयातील चारही विधानसभा जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार देणार आहेत. या विधानसभेवरील उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष विकास पाटील यांनी दिली. धाराशिव जिल्हयातील भुम परंडा वाशी, कळंब-धाराशिव, तुळजापूर, उमरगा या चारही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष निवडणूक लढणार असून उमेदवार लवकरच जाहीर करणार आहे. धाराशिव जिल्हयाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास पाटील यांनी जाहीर केले आहे.
-
Maharashtra News Live : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून खुला, अर्थव्यवस्थेला मिळणार चालना
चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाळ्याचे तीन महिने म्हणजे 1 जुलै ते 30 सप्टेंबर ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा पर्यटनासाठी बंद असतो. या काळात ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अंतर्गत रस्ते पावसामुळे सफारीसाठी उपयुक्त नसल्याने आणि या काळात अनेक जीवजंतू, प्राणी आणि पक्षांचा प्रजनन काळ असल्यामुळे पर्यटकांसाठी सफारी बंद करण्यात येते. मात्र पावसाचा जोर उतरताच आज पासून पुन्हा एकदा ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांच्या सेवेत दाखल होत आहे. ताडोबात आज पासून पर्यटकांची रेलचेल सुरू होणार असल्यामुळे स्थानिक लोकांच्या रोजगाराला आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.
-
Maharashtra News Live : इम्तियाज जलील यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल कोंढवा पोलीस ठाण्यात इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, म्हणून काल शंभू भक्तांनी ठिय्या मांडला होता. आता तिरंगा रॅली दरम्यान छत्रपती संभाजीनगर बोर्डला काळ फासण्यात आलं आहे. यामुळे शंभु भक्तांच्या भावना दुखावल्या म्हणून काल ठिय्या मांडण्यात आला. आता याप्रकरणी इम्तियाज जलील यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
Maharashtra News Live : धुळे शहरातील काही भागाची बत्ती गुल
धुळे शहरातील काही भागाची बत्ती गुल झाली आहे. गेल्या 7 तासांपासून धुळ्यातील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. रात्री आठ वाजल्यापासून धुळे शहरातील मोगलाईसह बाजारपेठ विभागाची लाईट बंद करण्यात आली आहे. गेल्या सात तासापासून हा सर्व भाग अंधारात आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अधिकारी नागरिकांचे कॉल उचलत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वीज नसल्याने संपूर्ण परिसरात डास मच्छरांचा त्रास वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
Published On - Oct 02,2024 8:33 AM