खंडणी मागितल्याचा आरोप, काँग्रेसच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा

लातूर : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या लातुरात खासगी कोचिंग क्लासेसचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात पसरला आहे. याच व्यवसायिक स्पर्धेतून अलीकडेच  क्लासेस संचालक अविनाश चव्हाण यांची हत्या झाली. तर आता काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी क्लासेस चालकांना 25 लाखांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. अध्ययन नावाने विजय परिहार आणि राजीव तिवारी हे खासगी कोचिंग क्लासेस …

खंडणी मागितल्याचा आरोप, काँग्रेसच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा

लातूर : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या लातुरात खासगी कोचिंग क्लासेसचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात पसरला आहे. याच व्यवसायिक स्पर्धेतून अलीकडेच  क्लासेस संचालक अविनाश चव्हाण यांची हत्या झाली. तर आता काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी क्लासेस चालकांना 25 लाखांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

अध्ययन नावाने विजय परिहार आणि राजीव तिवारी हे खासगी कोचिंग क्लासेस चालवतात. यांना काँग्रेसचे नगरसेवक पुनीत पाटील आणि सचिन म्हस्के यांनी आपल्या मित्रांसह तब्बल 25 लाखाची खंडणी मागितली असल्याची घटना समोर आली. या प्रकरणी नगरसेवक सचिन म्हस्के यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर दुसरे नगरसेवक पुनीत पाटील हे फरार आहेत.

इतर पाच आरोपीत समावेश असलेले विनोद खटके हे व्हीएस पँथर नावाची संघटना चालवतात, लोकसभा लढवण्याची त्यांची तयारी सुरु आहे. फिर्यादीत  आणखी अनोळखी चार आरोपी असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र हे आरोपी कोण आहेत याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक पुनीत पाटील आणि कोचिंग क्लासेसचे संचालक फिर्यादी विजय परिहार, राजीव तिवारी यांची कोचिंग क्लासेसच्या व्यवसायात भागीदारी होती. या भागीदारीत कालांतराने वाद सुरु झाले आणि परिहार आणि तिवारी यांनी पुनीत पाटील यांची भागीदारी तोडली.

नगरसेवक पुनीत पाटील यांनी फिर्यादींना धडा शिकविण्यासाठी नगरसेवक सचिन मस्के, विनोद खटके यांची मदत घेतली. त्यानुसार विजय परिहार आणि राजीव तिवारी यांना अज्ञात ठिकाणी नेऊन मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे असे आरोप गुन्ह्यात नोंदविण्यात आले आहेत.

पोलीस आता या प्रकरणाची सत्यता आणि वस्तुस्थिती तपासण्याचे काम करीत आहेत. मात्र या घटनेने लातूरच्या शैक्षणिक वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *