संजय राऊतांविरोधात उदयनराजे समर्थकांचा संताप, राम कदम पोलिसात

शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात निदर्शने करण्यात येणार आहेत

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:27 AM, 16 Jan 2020

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मागितल्यानंतर साताऱ्याचे रहिवासी संतापले आहेत. साताऱ्यात कडकडीत बंदची हाक देण्यात आली आहे, तर भाजप आमदार राम कदम पोलिसात तक्रार दाखल (Udayanraje Supporters against Sanjay Raut) करणार आहेत.

संजय राऊत यांच्या विरोधात उदयनराजे समर्थक आक्रमक झाले आहेत. शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केल्याच्या निषेधार्थ साताऱ्यातील पोवई नाका परिसरात निदर्शने करण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे राजवाडा येथे गांधी मैदानावर उदयनराजे समर्थक मोठ्या प्रमाणात जमणार आहेत. यानंतर साताऱ्यातून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

“संजय राऊत त्यांचं आडनाव बदलून खान करणार असावेत. छत्रपतींच्या विरोधात बोलणारी ही मुघलांची औलाद आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपतींवर प्रेम केलं, छत्रपतींच्या आशीर्वादाने शिवसेना बनवली. त्या पक्षाचे खासदार छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागत असतील, तर ते निश्चितपणे सत्तेसाठी लाचार असलेली मुघलांची औलाद आहेत.” असं प्रसाद लाड म्हणाले होते.

संजय राऊत काय म्हणाले होते?

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाज महाराजांवरील वादग्रस्त पुस्तकावर बोलताना शिवसेनेवर सडकून टीका केली होती. शिवसेनेने “शिवसेना” हे नाव ठेवताना छत्रपतींच्या वंशजांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न केला होता. तसेच शिवसेनेचं नाव बदलून ‘ठाकरे सेना’ करा, असा खोचक सल्लाही शिवसेनेला दिला होता. यावर संजय राऊत यांनी उदयनराजे भोसलेंवर हल्लाबोल केला होता.

शिवसेनेने माफी मागावी, उद्धव ठाकरेंनी राऊतांवर कारवाई करावी : चंद्रकांत पाटील

‘उदयनराजे शिवसेना हे नाव ठेवताना छत्रपतींच्या वंशजांना विचारलं होतं का, असा प्रश्न करत आहेत. मात्र, त्यांनी ते वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत. छत्रपती शिवाजी महाराज हे या विश्वाचं दैवत आहे. आम्ही जेव्हा गणपतीची पूजा करतो तेव्हा तुझी पूजा करु का म्हणून विचारायला जात नाही.” असं संजय राऊत म्हणाले होते.

Udayanraje Supporters against Sanjay Raut