बीडमधील असंख्य महिलांनी गर्भाशय काढले, कॅन्सरची भीती दाखवून फसवणूक

सध्या बीडपासून 30 किलोमीटर अंतरावरील वंजारवाडी हे गाव मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. या गावातील निम्म्याहून अधिक महिलांनी आपली गर्भाशये काढून टाकली आहेत.

बीडमधील असंख्य महिलांनी गर्भाशय काढले, कॅन्सरची भीती दाखवून फसवणूक

बीड : कधी काळी स्त्री भ्रूण हत्येमुळे बीड जिल्हा जागतिक पातळीवर चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत येत आहे आणि त्याला कारण आहे बीड जिल्ह्यातील हजारो महिला आपली गर्भाशय काढत असल्याचे. बीडपासून 30 किलोमीटर अंतरावरील वंजारवाडी गावात निम्म्याहून अधिक महिलांनी आपली गर्भाशय काढून टाकली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात महिला गर्भाशय का काढत आहेत? या महिलांना कुठली भीती सतावत आहे? याबाबत आरोग्य यंत्रणा गाफील असल्याचे पाहायला मिळत आहे.

महिलांना गर्भाशये काढून टाकण्यासाठी गर्भशयाचा कॅन्सर होईल, अशी भीती दाखवली जात असल्याचीही चर्चा आहे. याच गावातील 2 महिलांचा गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे मृत्यू देखील झाला आहे. हा कॅन्सर आपल्यालाही झाला तर भविष्यात आपले काय होईल? आपण जिवंत राहू की नाही? या भीतीने गावातील असंख्य महिलांनी गर्भाशये काढून टाकली. वंजारवाडी गावातील कोणत्याही घरात जाऊन विचारलं तर त्या घरात किमान एक तरी महिला गर्भ पिशवी काढलेली सापडते.

निलावती सानप या वंजारवाडीतील एक गरीब महिला आहेत. डॉक्टरांनी त्यांना गर्भपिशवी काढल्यानंतर पोटाचा त्रास कमी होईल, असे सांगितले. यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी कर्ज काढून आपली गर्भपिशवी काढली. यानंतर गर्भपिशवीचा आणि पोटाचा त्रास तर कमी झाला, पण निलावती बाईंना आता दुसरेच त्रास सुरू झाले. सध्या त्यांची डाव्या बाजूची नस पूर्ण बंद झाली आहे. कधी कधी चक्कर येतात आणि त्रास दररोजच वाढत चालला आहे. त्यामुळे आज त्यांना गर्भपिशवी काढण्याचा पश्चाताप तर होतोच पण गर्भपिशवी काढण्याशिवाय पर्यायही नव्हता, असं त्या सांगतात. यावरुन त्यांना गर्भपिशवी काढण्यासाठी किती समजावण्यात आले असेल, याचा सहज अंदाज येतो.

डॉक्टर असे उपचार सांगतातच कशासाठी?

गर्भपिशवी काढल्यानंतर निलावती बाईंना पुढील उपचारासाठी आजपर्यंत 2 लाख रुपयांचा खर्च झाल्याचे त्यांचे पती सांगतात. जर गर्भपिशवी काढल्यानंतरही इतक्या मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असेल, पैसा खर्च होत असेल आणि मानसिक ताण सोसावा लागत असेल तर डॉक्टर असे उपचार सांगतातच कशासाठी? असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे. वंजारवाडी गावातील असंख्य महिलांनी अशाच पद्धतीने आपली गर्भाशये काढून टाकली आहेत आणि आता त्या वेगवेगळ्या त्रासाला तोंड देत आहेत.

‘वेळेवरच गर्भपिशवी काढून टाकली असती, तर त्यांचा जीव वाचला असता’

लीलावती बाई यांनी गर्भपिशवी काढण्याची घाई केली याला कारणही महत्त्वाचं होतं. मंदारवाडा गावातील 2 महिलांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक होत्या शशिकला सानप. शशिकला बाईंचा काही वर्षांपूर्वी गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे मृत्यू झाला. त्यामुळे शशिकला यांची वेळेवरच गर्भपिशवी काढून टाकली असती, तर त्यांचा जीव वाचला असता, असं त्यांच्या नवर्‍याचं म्हणणं आहे. यामुळे असा आपलाही मृत्यू होऊ नये यासाठी वंजारवाडी गावातील असंख्य महिला आपल्या गर्भपिशव्या काढून टाकत आहेत.

आरोग्य यंत्रणा कुठे गायब झाली?

देशात गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. महिलांना होणाऱ्या प्रमुख कॅन्सरच्या आजारांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर सर्वात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा भीतीच्या परिस्थितीमध्ये आरोग्य यंत्रणेने महिलांना धीर देऊन योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. मात्र, मार्गदर्शनाची अपेक्षा असलेली आरोग्य यंत्रणा आज कुठे गायब झाली आहे? असा प्रश्न विचारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने आणि महिला बालकल्याण विभागाने महिलांच्या या समस्येकडे वेळीच लक्ष दिलं असतं, तर या गावातील त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील असंख्य महिलांची गर्भाशये आज सुरक्षित राहिली असती.

गंभीर दखल घेत महिला आयोगाचे बीड जिल्हा प्रशासनाला चौकशीचे आदेश

आता या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत महिला आयोगाने बीड जिल्हा प्रशासनाला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महिला आयोगाच्या आदेशानुसार बीड प्रशासनाने या संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. मात्र, हा सर्व प्रकार चौकशीपर्यंतच थांबतो की प्रशासन यावर काही उपाय करणार आहे हे बघणं आता महत्त्वाचं ठरेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *