Video : एसटी महामंडळ, मंत्रालयाचा इशारा आणि कारवाई; दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांवर बांगड्या विकण्याची वेळ!

आधीच कमी पगार आणि त्यात मागील दोन महिन्यांपासून पगारच नाही, त्यामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळी आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मकर संक्रांतीच्या सणाला बाजारात बांगड्या विकण्याचा व्यवसाय हाती घेण्याची वेळ उस्मानाबादमधील एका एसटी बस चालकावर आली आहे. तर एका एसटी कर्मचाऱ्याने वेल्डिंगच्या दुकानात काम करायला सुरुवात केलीय.

Video : एसटी महामंडळ, मंत्रालयाचा इशारा आणि कारवाई; दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांवर बांगड्या विकण्याची वेळ!
उस्मानाबादमध्ये एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

उस्मानाबाद : राज्यात मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन (ST Workers Strike) सुरुच आहे. आतापर्यंत 70 एसटी कर्मचाऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय. सरकारकडून मूळ पगारात 41 टक्के वाढ करण्यात आल्याचं सांगण्यातं येतं. मात्र, एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. अशावेळी राज्य सरकारकडून काही एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फी आणि सेवा समाप्तीचीही कारवाई करण्यात येत आहे. तर आधीच कमी पगार आणि त्यात मागील दोन महिन्यांपासून पगारच नाही, त्यामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळी आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मकर संक्रांतीच्या सणाला बाजारात बांगड्या विकण्याचा व्यवसाय हाती घेण्याची वेळ उस्मानाबादमधील एका एसटी बस चालकावर आली आहे. तर एका एसटी कर्मचाऱ्याने वेल्डिंगच्या दुकानात काम करायला सुरुवात केलीय.

मागील 57 दिवसांपासून उस्मानाबादमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. 2 महिन्यांपासून या एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. रोजच्या गरजा आणि कौटुंबिक जबाबदारी पार पडण्यासाठी आता कर्मचाऱ्यांनी मजुरीला सुरुवात केलीय. तर काहींनी आपल्या ऐपतीप्रमाणे छोटा-मोठा व्यवसाय सुरु केलाय. उस्मानाबाद बस आगारात गेली 15 वर्षांपासून वाहक म्हणून काम करणारे संतोष राऊत हे मकर संक्रांत सणानिमित्त बाजारात मोठं मोठ्यानं ओरडून बांगड्या विकताना पाहायला मिळाले. 5 हजार रुपयेचं भांडवल जमा करून किंबहुना उसने पैसे घेत त्यांनी त्यांनी हा व्यवसाय सुरु केला आहे. सरकारने आता संपावर तोडगा काढावा व संपकरी कर्मचारी यांचे केलेले निलंबन आणि बडतर्फीची कारवाई मागे घ्यावी, अशी विनंती संतोष राऊत यांनी केलीय.

दुसरीकडे एसटीचे चालक धर्मराज मोरे यांनी लेकरा-बाळाचं पोट भागवण्यासाठी वेल्डिंगच्या दुकानात हेल्परं काम करायला सुरुवात केली आहे. त्यांना दिवसाकाठी हातात 300 ते 400 रुपये रोजगार मिळतो. सध्या त्यावरच त्यांच्या कुटुंबाची उपजीविका सुरु आहे. पगार नाही, घरची शेती नाही, त्यामुळे त्यांनी रोजंदारीनं कामावर जाण्याशिवाय पर्यात उरलेला नाही. ही अवस्था एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी नाही. तर संपूर्ण राज्यभरातील एसटीचे कर्मचारी आपल्या कुटुंबाचं दोन वेळचं पोट भरण्यासाठी सध्या मिळेल ते काम करत आहेत. त्यामुळे सरकारनं न्याय द्यावा, अशी मागणी हे संपकरी कर्मचारी करत आहेत.

आतापर्यंत तीन हजार कर्मचारी बडतर्फ

वारंवार आवाहन करूनही एसटी कर्मचारी कामावर हजर न राहिल्याने महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. संप सुरू झाला होता यावेळी 92 हजार कर्मचारी पटलावर होते, दोन हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती झाली होती. तसेच कालपर्यंत 3 हजार 100 कर्मचारी सेवेतून बडतर्फ झाले आहेत, अशी माहिती एसटीच्या व्यवस्थापकीय महासंचालकांनी दिली आहे. तसेच संप केल्यामुळे या काळात तब्बल 5 हजार कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. साधारण 87 ते 88 हजार कर्मचारी सध्या पटावर आहेत, त्यातील 26 हजार 500 कर्मचारी कामवर असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच शक्यतो बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार नाही, ती तेवढी सहज प्रक्रिया नाही, ती क्लीष्ट प्रक्रिया असल्याचे सांगण्यात आले आहे. एसटीचे 37 आगार पूर्ण बंद आहेत, तर उर्वरीत आगार कमी क्षमतेने सुरू आहेत.

इतर बातम्या :

‘फडणवीस हे कुटुंबप्रमुख, दरेकर आणि मी संताजी, धनाजीची जोडी’, नाराजीच्या चर्चेनंतर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया

आजारपणामुळे पंतप्रधानांच्या बैठकीला गैरहजर, मग पालिकेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित कसे?; प्रवीण दरेकरांचा सवाल

Published On - 7:15 pm, Fri, 14 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI