युतीत राहायचं असेल तर संपूर्ण राज्यभर राहा, दानवेंचा मेटेंना अल्टिमेटम

युतीत राहायचं असेल तर संपूर्ण राज्यभर राहा, दानवेंचा मेटेंना अल्टिमेटम

बीड : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमध्ये समर्थन देणार नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष आणि जालना मतदरासंघातील विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांनी विनायक मेटेंना अल्टिमेटम दिलं आहे. ‘राज्यात राहायचं असेल तर बीडमध्येही राहावं लागेल’, असा इशारा दानवेंनी मेटेंना दिला.

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

“युती राज्यात आहे पण बीडमध्ये नाही, मेटेंचं हे विधान चुकीचं आहे. जर त्यांना युतीमध्ये राहायचं असेल तर बीडमध्येही राहावं लागेल”, असं अल्टिमेटम दानवेंनी मेटेंना दिलं.

काय आहे प्रकरण?

पंकजा मुंडे यांच्याकडून कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, विनायक मेटे यांनी बीडमध्ये पंकजा मुंडेंसोबत काम करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यात भाजपचा प्रचार करु मात्र बीडमध्ये करणार नाही, असा पवित्रा मेटेंनी घेतला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना बीडमध्ये धनंजय मुंडे आणि विनायक मेटे असा दुहेरी सामना करावा लागणार असल्याची शक्यता आहे. जर शिवसंग्रामने पंकजा मुंडेंना बीडमध्ये समर्थन दिले नाही तर याचा मोठा फटका पंकजांना नक्कीच बसू शकतो.

पंकजा मुंडे आणि विनायक मेटे वाद

पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील हा वाद काही नवा नाही. पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना जवळ केल्यानंतर विनायक मेटे हे नाराज झाले होते. तिथूनच मेटे – मुंडेंत राजकीय तेढ निर्माण झाला.
पंकजा मुंडे एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर शिवसंग्रामचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना देखील मेटे यांच्यापासून दूर केले. त्यामुळे मेटे आणि मुंडेंचं राजकीय वैर शिगेला पोहोचलं. त्यामुळेच आता कार्यकर्त्यांच्या इच्छेवरुन बीड जिल्ह्यात पंकजा मुंडेंसोबत काम न करण्याचा निर्णय शिवसंग्रामने घेतला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *