आदर्श गाव राळेगणसिद्धीत आचार संहितेचा भंग, मतदारांना साड्या वाटप करताना कारवाई

आदर्श गाव राळेगणसिद्धी येथे निवडणुकीच्या आदर्श आचार संहितेचं उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आलाय. राळेगणमध्ये मतदारांना साड्या वाटप करताना दोघांना पकडण्यात आलंय.

आदर्श गाव राळेगणसिद्धीत आचार संहितेचा भंग, मतदारांना साड्या वाटप करताना कारवाई

अहमदनगर : आदर्श गाव राळेगणसिद्धी येथे निवडणुकीच्या आदर्श आचार संहितेचं उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आलाय. राळेगणमध्ये मतदारांना साड्या वाटप करताना दोघांना पकडण्यात आलंय. सुरेश दगडू पठारे आणि किसन मारुती पठारे अशी आरोपींची नावं आहेत. ते मतदारांना साड्या वाटत असताना भरारी पथकाने ही कारवाई केली. पथकाने 10 लाख रुपयांची इनोव्हा कार आणि 27 हजार 200 रुपयांच्या 136 साड्या जप्त केल्या. पथकाने काही महिलांसह 4 जणांविरुद्ध आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय (Violation of Model Code of Conduct of Election in Ralegan Siddhi).

दरम्यान, आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित झालीय. अण्णा आणि पवारांना बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यात अपयश आल्याने या दोघांच्याही वर्चस्वासाठी हा धक्का मानला जातोय.

अण्णा आणि लंकेंना अपयश

राळेगणसिद्धीमध्ये यंदा देखील बिनविरोध निवडणूक होणार नाही. राळेगणसिद्धीत बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि आमदार निलेश लंके यांनी कसोशीने प्रयत्न केले होते. त्यांच्या या मोहिमेला यशही आले होते. गावकऱ्यांची बैठक घेऊन बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी माशी शिंकली असून अण्णा आणि लंके यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. त्यामुळे राळेगणमध्ये निवडणूक होत आहे. त्यातच आचारसंहिता भंग झाल्याने आदर्श गाव राळेगणसिद्धीची नाचक्की होत असल्याची चर्चा आहे.

फक्त दोन जागा बिनविरोध

राळेगणसिद्धीच्या ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या 9 आहे. पण या 9 पैकी फक्त दोनच जागा बिनविरोध करण्यात अण्णा हजारे यांना यश आले आहे. उरलेल्या 7 जागांवर निवडणुका होणार आहेत. 5 वर्षापूर्वी राळेगणसिद्धीत ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. त्याआधी अपवाद वगळता एखाद-दोन वेळा निवडणुका झाल्या. काही वेळा बिनविरोध निवडणुकाही झाल्या. पण ही परंपरा कायम राखण्यात अण्णांना सपशेल अपयश आले आहे.

25 लाखांची जादू चालली नाही

आमदार निलेश लंके यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाखांचा विकास निधी देण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या अभियानाला उत्तम प्रतिसादही मिळाला. त्यामुळे पारनेर तालुक्यातील 110 ग्रामपंचायतींपैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोधही झाल्या. तसेच लंके यांच्या प्रयत्नाने 776 पैकी 210 सदस्य बिनविरोध निवडूनही आले. पण त्यांच्या 25 लाखांची जादू राळेगणमध्ये काही चालली नसल्याचं दिसून येतं.

नवी पिढी, नवं राजकारण

हिवरे बाजार आणि राळेगणसिद्धीमध्ये बिनविरोध निवडणूक न होण्यामागे राजकीय साचलेपण हे एक कारण असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. त्याच त्याच लोकांना प्रत्येक वेळेस बिनविरोध निवडून आणलं जायचं. त्यामुळे गावातील इतर सदस्यांना गावच्या राजकीय प्रक्रियेत भाग घेण्याची संधीच मिळत नव्हती. त्यामुळे तरुणांनी हा नेहमीचा साचलेपणा झुगारून लावून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळेच राळेगण आणि हिवरे बाजारमध्ये निवडणूक होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हेही वाचा :

राळेगणसिद्धी, हिवरे बाजारच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित; अण्णा, पोपटराव पवारांच्या वर्चस्वाला धक्का?

राळेगणसिद्धी ग्राम पंचायत वर्षानुवर्ष बिनविरोध कशी?

हे वाचाच, भारतीय म्हणून तुम्हालाही अण्णा हजारेंचा अभिमान वाटेल!

Violation of Model Code of Conduct of Election in Ralegan Siddhi

Published On - 1:43 am, Fri, 15 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI