राज्यात भीषण पाणीटंचाई, 18 टक्केच पाणीसाठा शिल्लक

 • गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
 • Published On - 8:33 AM, 4 May 2019
राज्यात भीषण पाणीटंचाई, 18 टक्केच पाणीसाठा शिल्लक

नागपूर : राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून अवघा 18 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीने राज्यातील पाण्यासंदर्भात चिंता वाढली आहे. आता मे महिना सुरु आहे. पाऊस सुरु होण्याला साधारण महिनाभराचा अवधी बाकी असताना, राज्यातील बरीच धरणं तळाला गेली असल्याने भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे.

जलसंपदा विभागानुसार धरण प्रकल्पांबाबत महाराष्ट्रात सहा विभाग पाडले जातात. यात अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे अशा सहा विभागांचा समावेश होतो.

महाराष्ट्रात कुठल्या विभागात किती धरण प्रकल्प?

 • अमरावती – 446
 • औरंगाबाद – 964
 • कोकण – 176
 • नागपूर – 384
 • नाशिक – 571
 • पुणे – 726
 • एकूण – 3267

कुठल्या धरणात किती पाणीसाठा? (3 मे 2019 ची आकडेवारी)

 • अमरावती – 23.92 टक्के (गेल्यावर्षी याच दिवशी – 20.65 टक्के पाणीसाठा)
 • औरंगाबाद – 5.11 टक्के (गेल्यावर्षी याच दिवशी -27.75 टक्के पाणीसाठा)
 • कोकण – 39.86 टक्के (गेल्यावर्षी याच दिवशी – 45.91 टक्के पाणीसाठा)
 • नागपूर – 10.3 टक्के (गेल्यावर्षी याच दिवशी – 15.69 टक्के पाणीसाठा)
 • नाशिक – 17.62 टक्के (गेल्यावर्षी याच दिवशी – 30.81 टक्के पाणीसाठा)
 • पुणे – 21.43 टक्के (गेल्यावर्षी याच दिवशी – 33.87 टक्के पाणीसाठा)

म्हणजेच महाराष्ट्रातील एकूण 3267 धरण प्रकल्पांमध्ये आजच्या घडीला 18.51 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी हा पाणीसाठा 29.95 टक्के एवढा उपलब्ध होता.

जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी आणि यंदाची आजच्या दिवसाच्या आकडेवारी तपासली असता किंवा तुलना केली असता, यंदाची भीषण पाणीटंचाई तात्काळ लक्षात येते. विशेषत: औरंगाबाद विभागात पाण्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे.