घोटाळ्यांचा नांदेड पॅटर्न, धान्य, पोलीस भरतीनंतर आता टँकर घोटाळा

नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांत नोकर भरती घोटाळा, धान्य घोटाळा, पोलीस भरती घोटाळा उघडकीस आला होता. आता पाण्याच्या टँकरमध्येही घोटाळा करण्याच पाप नांदेडमध्ये घडताना दिसत आहे.

घोटाळ्यांचा नांदेड पॅटर्न, धान्य, पोलीस भरतीनंतर आता टँकर घोटाळा

नांदेड : जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. विशेषतः मुखेड तालुक्यात सर्वात वाईट परिस्थिती आहे. मात्र तालुक्यात कागदोपत्री टँकर सुरु असल्याचे दाखवत बिल उचलून घेत असल्याचा आरोप मुखेडच्याच आमदाराने केला आहे. या सगळ्या प्रकाराने नांदेड जिल्ह्यात पाण्याच्या टँकरमध्येही घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे.

नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांत नोकर भरती घोटाळा, धान्य घोटाळा, पोलीस भरती घोटाळा उघडकीस आला होता. आता पाण्याच्या टँकरमध्येही घोटाळा करण्याच पाप नांदेडमध्ये घडताना दिसत आहे. मात्र हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी पारदर्शी चौकशी होण गरजेचे आहे. जिल्ह्यातील टंचाईचा आढावा घेण्यासाठी नूतन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रशासनाची आढावा बैठक घेतली, त्यात या घोटाळ्याची वाच्यता झालीय. घोटाळ्याचा हा नांदेड पॅटर्न सर्वांनाच लाज वाटण्यासारखा ठरतोय.

जिल्ह्यात आजघडीला 133 टँकरने पाणी पुरवठा केल्या जातो आहे. त्यापैकी एकट्या मुखेड तालुक्यात 60 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र मुखेडचे आमदार तुषार राठोड यांनी 4 जून रोजीची ताजी आकडेवारी या बैठकीत उघड केली. मुखेड तालुक्याला 4 जून रोजी 59 फेऱ्या मंजूर आहेत, मात्र त्यापैकी 40 टँकरच्या फेऱ्या गावात पोहोचलेच नाही असा आरोप आमदार राठोड यांनी केला. इतकेच नाही तर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी टँकर पोहोचत नसल्याचे दावे अनेकांनी याच बैठकीत केले.

या सगळ्या प्रकारावर खासदार प्रताप पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चार दिवसात काय ते तथ्य शोधून टँकरच्या ठेकेदारावर फौजदारी कारवाई करा, अशी सूचनाच त्यांनी बैठकीत केली. यावर प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची नोटीस बजावल्याचे ‘तात्पुरते’ उत्तर देऊन वेळ मारुन नेली.

दरम्यान, गावात पाण्याच टँकर आल्यावर त्या गावातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण बंधनकारक आहे. गावातील सरपंच ग्रामसेवक यांच्याही स्वाक्षऱ्या घेणं आवश्यक आहे, असे नियम आहेत. मात्र जीपीएससारखी आधुनिक यंत्रणा असतानाही सरकारी धान्य काळ्या बाजारात विकल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यात काय अशक्य आहे, असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे पाण्याच्या टँकर पुरवठामध्ये नांदेड जिल्ह्यात मोठा घोटाळा होत असून या प्रकाराची उच्चपातळीवरुन चौकशी होण गरजेचे आहे.

विशेष म्हणजे टँकर घोटाळ्यात गुंतलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही शोध घेण गरजेचे आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांनी आता कोणतेच क्षेत्र शिल्लक ठेवले नसल्याचे या प्रकारावरून उघड होतय. एकीकडे पाण्यासाठी टाहो फोडणारे सर्वसामान्य आणि त्याच पाण्यावर आपले उखळ पांढरे करून घेणाऱ्याचा शोध लागलाच पाहिजे असा सूर पाणी टंचाईच्या या आढावा बैठकीत निघाला. आता या टँकर घोटाळ्यात पुढे काय होत त्याकडे जिल्ह्याच लक्ष लागलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *