इतरांना 26/11च्या दिवशीच राहुलची आठवण येते, पण आम्हाला रोजच येते, मावसभावाची भावनिक प्रतिक्रिया

मुंबई पोलीस आयुक्तालय इथे शहिदांना श्रद्धांजली देण्यात आली आहे. (Martyr Rahul Shinde)

  • हेमंत बिर्जे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 11:03 AM, 26 Nov 2020

मुंबईः 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला (26/11 attack) 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2008 साली हा दहशतवादी हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलिसांमार्फत पोलीस आयुक्तालयात मानवंदना देण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकाऱ्यांचं स्मृतिस्थळ पहिल्यांदा पोलीस जिमखाना, मरिन ड्राईव्ह इथे श्रद्धांजली दिली जायची. मात्र यंदा कोस्टल रोड प्रोजेक्टच्या कामामुळे मुंबई पोलीस आयुक्तालय इथे श्रद्धांजली देण्यात आली आहे. (We Remember The Martyr Rahul Shinde In 26/11 Every Day, Brother Reaction)

या श्रद्धांजली कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस कमिश्नर, बीएमसी कमिश्नर यांच्यासह शहिदांचा परिवार उपस्थित आहेत. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस शिपाई राहुल शिंदे शहीद झाले. राहुल यांची आठवण आम्हाला रोजच येते, आम्ही त्याच्या आठवणीतच जगतो, मात्र इतरांना त्याची आठवण फक्त 26/11च्या दिवशी येते, अशी उद्विग्न भावना शहीद राहुल शिंदे यांचे मावसभाऊ दत्तात्रय शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

शिवाय राहुल यांच्या स्मरणार्थ माढा तालुक्यातील त्यांच्या सुलतानपूर गावाचे नाव बदलून राहुलनगर, असे ठेवण्यात आले आहे, मात्र त्याची अंतिम शासकीय कारवाई अद्याप झालेली नाही, ज्याचा आम्ही 12 वर्षांपासून पाठपुरावा करतोय, असं सुद्धा मावसभाऊ दत्तात्रय शिंदे यांनी अधोरेखित केले आहे.

याच वेळी शहीद प्रकाश मोरे यांचा मुलगा प्रतीक मोरेसुद्धा आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. आम्हाला आमच्या शहिदांबद्दल रोज आठवण येते, पण पाकिस्तानमधले मास्टरमाईंड हाफिज सईद आणि लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांवर कुठल्याही प्रकारची अद्याप कारवाई झालेली नाही त्याची खंत वाटत आहे, असंही प्रतीक मोरे म्हणाले आहेत.

मुंबई हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू

मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी मोठा अतिरेकी हल्ला झाला होता. या हल्ल्याची मुंबईकरांना आजही आठवण आली तर अंगावर शहारे येतात. लष्कर-ए-तोय्यबा या दहशतवादी संघटनेच्या 10 अतिरेक्यांनी संपूर्ण मुंबईत हाहा:कार माजवला होता. या हल्ल्यात 166 निरापराध लोकांचा मृत्यू झाला होता. तर 300 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले होते. या हल्ल्यावेळी अतिरेकी समुद्रमार्गे भारतात दाखल झाले होते. या अतिरेकी हल्ल्यात मुंबई पोलीस, एटीएस आणि एनएसजीचे 11 जवान शहीद झाले होते.

संबंधित बातम्या :

दहशतवाद्यांचा पुन्हा 26/11 हल्ला घडवण्याचा कट? पंतप्रधान मोदींची अमित शाह आणि अजित डोवाल यांच्यासोबत बैठक

घुसखोरी करणारा एकही अतिरेकी जिवंत परतणार नाही; लष्करप्रमुखांचा निर्वाणीचा इशारा