आम्हाला जास्त जागा द्या, नाही तर… शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान काय?; महायुतीत इशारेबाजी सुरूच
राज्यात विधानसभा निवडणुका कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जागा वाटपावर जोर दिला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील वरिष्ठ नेते जागा वाटपावर चर्चा करत आहेत. एकीकडे नेत्यांनी चर्चा सुरू केलेली असतानाच महायुतीतील दुसऱ्या फळीतील नेते मात्र या जागा वाटपावर भाष्य करताना दिसत आहेत.
महायुतीत सारं काही अलबेल असल्याचं सीनियर नेते सांगत असले तरी ग्राऊंड लेव्हलला महायुतीत काहीच अलबेल नसल्याचं दिसून येत आहे. आमदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये इशारेबाजी सुरूच आहे. अनेक वाचाळवीरांना कानपिचक्या दिल्यानंतरही ही इशारेबाजी सुरू आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने अनेक नेते जागा वाटपाबाबत परस्पर भाष्य करताना दिसत आहेत. काही नेते तर किती जागा पाहिजे याचा आकडाच सांगत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. रोज रोज स्पष्टीकरण देताना या नेत्यांचे नाकीनऊ आले आहेत. आता तर शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी महायुतीत जास्त जागांची मागणी केली आहे.
शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी जास्त जागांची मागणी केली. एकनाथ शिंदे हेच विधानसभा निवडणुकीत महायुतीचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे आम्हाला जास्त जागा मिळाव्यात ही अपेक्षा आहे. आम्हाला जास्त जागा नाही मिळाल्या तर किमान समान जागा तरी मिळाव्यात एवढी आमची मागणी असणार आहे, असं अर्जुन खोतकर यांनी सांगितलं.
स्वबळावर सत्ता येणं इतिहासजमा
जागा वाटपाचा निर्णय शेवटी नेते घेतील. मी निर्णय घेणार नाही. पण पक्षाचा एक शिपाई म्हणून आम्हाला सर्वाधिक जागा मिळाव्यात ही माझी भावना आहे. जास्तीत जास्त जागा मिळाल्याच पाहिजे. आता राज्यात एकट्याच्या बळावर सरकार येऊ शकत नाही. स्वबळावर सत्ता येणं हे इतिहासजमा झालं आहे, असं अर्जुन खोतकर म्हणाले.
मैत्रीपूर्ण लढती झाल्या आहेत
राज्यामध्ये आम्ही तीन पक्ष एकत्र लढतो. एखाद दुसऱ्या जागेवर किंवा 5-10 जागांवर टोकाचा प्रसंग येऊ शकतो. अशावेळी पक्षश्रेष्ठींना निर्णय घेणं अवघड होऊन जातं. त्यामुळे कार्यकर्ते नाराज होतात. ते इकडे तिकडे जाण्याची शक्यता असते. कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ नये म्हणून दोन पाच जागांवर कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो. तसं झाल्यास वावगं काही नाही, असं सांगतानाच यापूर्वी अशा मैत्रीपूर्ण लढती झालेल्या आहेत. पक्ष वाचवण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
शिंदे गटाचं नवं मिशन
दरम्यान, शिंदे गटाने नवं मिशन सुरू केलं आहे. त्यानुसार शिंदे गटाचे नेते मतदारसंघातील प्रत्येक 15 घरात जाऊन महिलांशी चर्चा करणार आहेत. त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला की नाही याची माहिती घेणार आहेत. या मिशनला ठाण्यातून सुरुवात झाली आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 घरात जाऊन या योजनेची माहिती घेतली आहे. महिलांशी चर्चा करून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला मतदारांवर फोकस केला आहे. त्यामुळे निवडणुकीत महायुतीला याचा किती फायदा होतो हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे.