महिला दिन विशेष : 25 एकर ओसाड माळ फुलवलं, 7 लाख कमावले

रत्नागिरी : प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर मेहनत घेण्याची तयारी असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे चिपळूणमधील वेहेळ गावतील महिला बचत गटांनी सिद्ध करून दाखवलं आहे. या महिला बचत गटाने ओसाड जमिनीवर यशस्वीपणे शेती करुन दाखवली आहे. एक-दोन नाही तर तब्बल 25 एकर ओसाड माळावर या महिलांनी अन्नपूर्णा प्रकल्पा अंतर्गत सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग केला …

महिला दिन विशेष : 25 एकर ओसाड माळ फुलवलं, 7 लाख कमावले

रत्नागिरी : प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर मेहनत घेण्याची तयारी असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे चिपळूणमधील वेहेळ गावतील महिला बचत गटांनी सिद्ध करून दाखवलं आहे. या महिला बचत गटाने ओसाड जमिनीवर यशस्वीपणे शेती करुन दाखवली आहे. एक-दोन नाही तर तब्बल 25 एकर ओसाड माळावर या महिलांनी अन्नपूर्णा प्रकल्पा अंतर्गत सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे कोकणातल्या बचत गटांसामोर एक नवा आदर्श त्यांनी ठेवला आहे.

प्रगती आणि भाग्यश्री या महिला बचत गटाने एकत्रितपणे काम करत शेती केली. त्यांनी एक-दोन नाही तर तब्बल 25 एकर इतक्या विस्तारीत जागेमध्ये कृषीक्रांती केली आहे. गावच्या ओसाड माळावरच्या जमिनी भाडे तत्वावर घेत त्यात कलिंगड, मिरची, भेंडी, कोबी, पडवळ, वांगी, चवळी, कारली, मका आणि झेंडू यासारख्या नफा देणाऱ्या भाजीपाल्याची लागवड केली. याचे भरघोस उत्पादनही घेतले. अन्नसुरक्षितता आणि विषमुक्त अन्नाचा सेंद्रिय शेतीचा विस्तीर्ण उपक्रम बचत गटाच्या महिलांनी वेहेळ मध्ये उभारला आहे.

शेतीतून सात लाखांची कमाई

गेल्या तीन वर्षांपासून या दोन्ही बचत गटाच्या महिला शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. वेहेळ अत्यंत ग्रामीण भागातील गाव आहे. येथील महिलांकडे जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी सुरुवातीपासूनच होती. दिशांतर या समाजसेवी संघटनेने त्यांची ती जिद्द हेरून त्यांच्या कष्टाला योग्य दिशा देण्याचे काम केले. सुरुवातीला लागणाऱ्या शेती अवजारांसह बियाणे आणि इतर आवश्यक बाबींचा पुरवठा करत दिशांतरने या महिलांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले आणि त्यातून महिलांनी गेल्या दोन वर्षात सलग 7 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. यावर्षी शेतीतून येणाऱ्या उत्पन्नातून बचत गट स्वतःच्या मालकीचे वाहन घेण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे.

सेंद्रिय खतांचा वापर

सध्याचा जमाना हा खूप जलद गतीने पुढे धावत आहे, असं म्हटलं जातं. त्यामुळे शेतीमध्येही जलद उत्पादन मिळवण्यासाठी विविध प्रकारचे रासायनिक खते बाजारात उपलब्ध आहेत. मात्र रासायनिक खतांवर पिकवलेल्या भाजांचा वापर वाढल्यामुळे त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होतो, असे अनेक तज्ञांनी म्हटले आहे. हाच धागा पकडत या महिलांनी सेंद्रिय खताचा वापर करुन सगळ्या भाजांचे उत्पादन केले आहे.

पुरुषांचं योगदान

महिलांच्या या यशात पुरुषांनीदेखील आपले भरीव योगदान दिलं आहे. एवढ्या विस्तीर्ण शेतीला पाण्याचा पुरवठा, वन्यजीव तसेच जनावरांपासून शेतीचे संरक्षण आणि महिलांना शेतीच्या कामात लागणारे आवश्यक मार्गदर्शन देण्याचे काम इथल्या पुरुषांनी केले. तसेच सहकारातून शेती बरोबरच या महिलांनी दलालमुक्त विक्री देखील सुरु केली. बचत गटाच्या काही महिला भाड्याच्या गाडीतून भाजी चिपळूणमधील मुख्य बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणतात. ज्याला ग्राहक वर्गातून मोठा प्रतिसादही मिळतो. इथल्या भाज्या बाजार भावापेक्षा कमी आणि सुरक्षित असल्यामुळे ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

ग्रामीण भागातील महिला सक्षम व्हाव्यात,स्वकर्तृत्ववान बनाव्यात त्याचप्रमाणे शेतीच्या माध्यमातून त्यांनी अर्थक्रांती करावी यासाठी दिशांतर संस्थेने अनेक महिला बचत गटांना कृषी क्षेत्रामध्ये पाठबळ देण्याच्या दृष्टीने सहकार्य केलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *