प्रसादात गुंगीचं औषध देऊन भाविकांची लूट, साईंच्या नगरीत परप्रांतिय महिलेला अटक

साई बाबांच्या प्रसादात एक महिला चोर गुंगीचं औषध देऊन महिला भक्तांचे दागिणे लुटत होती. त्यामुळे धार्मिक स्थळी कुणी प्रसाद देत असेल तर त्यावेळी तेवढीच खबरदारी बाळगणं गरजेचं आहे.

sai baba prasad, प्रसादात गुंगीचं औषध देऊन भाविकांची लूट, साईंच्या नगरीत परप्रांतिय महिलेला अटक

शिर्डी : धार्मिक स्थळी तुमची कशी आणि कोणत्या चलाखीने लूट केली जाऊ शकते याचं उदाहरण जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत समोर आलंय. साई मंदिरात प्रसादात गुंगीचं औषध देऊन एका वयोवृद्ध महिलेचे दागिने चोरणारी परप्रांतीय महिला मंदिर सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे पकडली गेली. साई बाबांच्या प्रसादात एक महिला चोर गुंगीचं औषध देऊन महिला भक्तांचे दागिणे लुटत होती. त्यामुळे धार्मिक स्थळी कुणी प्रसाद देत असेल तर त्यावेळी तेवढीच खबरदारी बाळगणं गरजेचं आहे.

साई बाबांच्या दुपारच्या माध्यान्ह आरतीनंतर भाविकांना मंदिर परिसरात साई बाबा संस्थानच्या वतीने शिऱ्याचा प्रसाद वाटण्यात येतो. याच प्रसादाला झारखंड येथील पिंकी नावाच्या महिलेने गुंगीचं औषध देऊन एका स्थानिक महिलेचे दागिने लुटले. अशा प्रकारे ती अनेक साईभक्तांना देखील लुटत असावी असा संशय पोलिसांना आहे. मंदिर सुरक्षा रक्षकांनी महिलेवर पाळत ठेऊन मोठ्या शिताफीने तिला अटक केली. सदर महिला झारखंड येथील असून पिंकी असं नाव तिने पोलिसांना सांगितलं. तिने चोरीचा गुन्हा कबुल केला आहे.

19 जून रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास शिर्डीतील बिरोबा कॉलनी येथे राहणारी वयोवृद्ध महिला छबुबाई गरड यांनी नेहमीप्रमाणे साईबाबांची दुपारची माध्यान्ह आरती पार पाडली. आरतीचा प्रसाद घेण्यासाठी छबुबाई गुरुस्थान मंदिराजवळ गेल्या असता तिथून एक महिला प्रसाद घेऊन त्यांच्या जवळ आली आणि त्यांना प्रसाद दिला. छबुबाई यांनी प्रसाद खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात त्यांना गुंगी येऊन तेथेच पडल्या. थोड्या वेळाने शुद्धीत आल्यानंतर आपल्या गळ्यातील तीन ग्रॅम सोन्याची पोत आणि काही पैसे चोरी गेल्याचं तिच्या लक्षात आलं. ही माहिती छबुबाई यांनी संस्थानच्या सुरक्षा रक्षकांना दिली. या माहितीच्या आधारे संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी 19 जून रोजी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. त्यात एक महिला या वयोवृद्ध आजीच्या गळ्यातील पोत काढून घेऊन जात असल्याचा प्रकार समजल्यांनतर संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी या महिलेचा तपास सुरु केला. अखेर ही महिला पुन्हा साई मंदिर परिसरात दिसून आल्याने या महिलेला पकडून सुरक्षा रक्षकांनी तिला संरक्षण कार्यालयात नेलं. अधिक चौकशीअंती सदर पिंकी नावाची महिला चोर असल्याचं निष्पन्न झालं. त्यांनतर मंदिर सुरक्षा विभागाने तिला शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.

शिर्डी साई बाबांच्या पुण्यनगरित चोरट्यांचा सुळसुळाट झालाय. स्थानिक आणि पर राज्यातील टोळ्याही सक्रिय झाल्या आहेत. मंदिर परिसर, बस स्थानक अशा विविध ठिकाणी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. पाकिटमारी, सोनसाखळी चोर, तसेच बसस्थानकावर तर महिला प्रवाशांच्या गळ्यातील दागिणे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भाविक पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून कधीकधी तक्रारही नोंदवत नाहीत. त्यामुळे चोरांचं मोठ्या प्रमाणात फावत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *