लहान बाहुली, मोठी सावली; जगातील सर्वात लहान गिर्यारोहक शर्विकाचा सलग दहावा विक्रम

शर्विका म्हात्रे ही अलिबाग तालुक्यातील लोणारे गावची कन्या असून तिने यापूर्वी तेवीस किल्ले सर केले आहेत. (Youngest Climber Sharvika Mhatre )

  • संतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा
  • Published On - 8:20 AM, 27 Jan 2021
लहान बाहुली, मोठी सावली; जगातील सर्वात लहान गिर्यारोहक शर्विकाचा सलग दहावा विक्रम

सातारा : जागतिक विक्रमवीर बाल गिर्यारोहक शर्विका जितेन म्हात्रे (Sharvika Mhatre) हिने पुन्हा एक विश्वविक्रम नोंदवून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अवघ्या साडेतीन वर्षांच्या शर्विकाने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई केवळ सव्वातीन तासात सर करुन सलग दहावा विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सर करणारी शर्विका ही जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे. (World’s Youngest Climber Sharvika Mhatre holds World Record)

कळसूबाई सर करुन पाच विक्रम खिशात

शर्विका म्हात्रे ही अलिबाग तालुक्यातील लोणारे गावची कन्या असून तिने यापूर्वी तेवीस किल्ले सर केले आहेत. नुकतीच तिची महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला सर केल्याबद्दल विक्रमात नोंद झाली होती. 72 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शर्विकाने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर केले. शर्विकाने स्वतःसोबतच महाराष्ट्राचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड आणि ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे.

दुर्ग सेवकांना मानवंदना

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने शर्विकाने शिखरावर पोहोचून मराठी भाषा संवर्धन आणि विकास यावर आधारित संदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धन करणाऱ्या समस्त दुर्ग सेवकांना मानवंदना दिली. सीमेवर लढणाऱ्या जवानांना आणि मराठी साहित्य विश्वाला ही मोहीम समर्पित केली आहे.

कळसूबाई शिखरावर 72 तिरंगा ध्वज

शर्विकाच्या या मोहिमेत तिच्यासोबत सुमारे पस्तीस गिर्यारोहकांचा समावेश होता. यामध्ये डॉक्टर्स, पोलीस, वकील, शिक्षक त्याचप्रमाणे साहित्यसंपदा संस्थेचे विविध साहित्यिकसुद्धा सहभागी झाले होते. शर्विकासोबतच्या संपूर्ण टीमकडून कळसूबाई शिखरावर 72 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 72 तिरंगा ध्वज फडकवण्यात आले. सहभागी साहित्यिकांकडून मराठी साहित्याशी निगडित ध्वज आणि फलक प्रदर्शित करण्यात आले. (World’s Youngest Climber Sharvika Mhatre holds World Record)

शर्विकाची ग्रंथतुला

कळसूबाई मोहिमेच्या समारोपानंतर साहित्यसंपदा या संस्थेतर्फे कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी शर्विकाची ग्रंथतुला करण्यात आली. तिच्या वजनाची सर्व पुस्तके गरजू शाळांना देण्यात येणार आहेत. शर्विकाच्या या विशेष मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

कलावंतीण सुळकाही सरसर सर

कर्जत माथेरान दरम्यान प्रबळगड किल्ला असून तो चढण्यासाठी साधारण तीन तासाचा अवधी लागतो. तेथून कलावंतीण सुळका चढण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे लागतात. कलावंतीण सुळका हा चढाईसाठी अत्यंत कठीण मानला जातो. आजूबाजूला कशाचाही आधार नसलेल्या दगडात कोरलेल्या पायर्‍या आणि आभाळाला भिडणारा सुळका तितकीच खाली खोल दरी अश्या नैसर्गिक रचनेमुळे हा सुळका सर करताना भल्याभल्यांची भंबेरी उडते. मात्र या चिमुकलीने हसत-खेळत हा गड सर केला आहे.

संबंधित बातम्या :

अडीच वर्षाच्या चिमुकलीची उंच भरारी, प्रबळगड कलावंतीणीचा सुळका सर

(World’s Youngest Climber Sharvika Mhatre holds World Record)