दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात विषारी दारुमुळे एकही मृत्यू नाही : पोलीस विभाग

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:13 PM, 2 Dec 2020

गडचिरोली :दारूबंदीमुळे गडचिरोली जिल्ह्यात विषारी दारू पिऊन मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे दारूबंदी उठवून शुध्द दारू पुरवावी’ अशी मागणी करणारे काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार आणि आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केली आहे. मात्र, सरकारी आकडेवारीवरुन त्यांचा दावा फोल ठरवत चांगलीच चपराक लगावली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी गडचिरोली पोलीस प्रशासनाकडे जिल्ह्यातील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी मागितली. त्यावर उत्तर देताना पोलीस प्रशासनाने एकही मृत्यू झाला नसल्याचं स्पष्ट केलं (Zero death due to Poisonous Alcohol Gadchiroli Police Department inform Dr Abhay Bang).

डॉ. अभय बंग यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे विषारी दारूमुळे किती मृत्यू झाले याची माहिती मागितली होती. यावर पोलीस प्रशासनाने लिखित उत्तर देत गेल्या पाच वर्षात गडचिरोली जिल्ह्यात विषारी दारुमुळे एकही मृत्यूची घटना घडलेली नाही, असं स्पष्ट केलं. त्यामुळे विजय वडेट्टीवार आणि धर्मरावबाबा आत्रम हे दारुबंदी हटवण्यासाठी चुकीचा दावा करून दारूबंदीबाबत अपप्रचार करत आहेत, अशी भूमिका जिल्हा दारुबंदी समितीने मांडली आहे.

“जिल्ह्यात विषारी दारुमुळे मृत्यू झालेले नाहीत. खरेच जर तसे मृत्यू झाले असते, तर लोक-प्रतिनिधी आणि मंत्री म्हणून त्यांनाच ते लांछनस्पद ठरेल. दारूबंदी हा शासकीय कायदा असून त्याची योग्य अंमलबजावणी ही शासनाची आणि नेत्यांची जबाबदारी आहे,” असं मत समितीने व्यक्त केलं आहे.

जिल्हा दारूबंदी समितीने म्हटलं आहे, “वस्तुत: शासन पुरस्कृत ‘शुध्द’ दारु देखील आरोग्याला आणि समाजाला घातकच आहे. दारूवर शासनाने कर घेतल्यामुळे ती लोकांच्या हिताची होत नाही. वैध आणि अवैध दोन्ही प्रकारची दारू ही घातकच आहे. म्हणून दारूबंदी हवी. ‘द लॅन्सेट’ या जगप्रसिध्द वैद्यकीय नियतकालिकाने निर्णय जाहीर केला आहे की शून्य दारू हीच सुरक्षित पातळी आहे. म्हणून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी कायम हवी. दारूबंदी केल्याने दारूचा पुरवठा व वापर जवळपास निम्मा होतो. पुढे अजून कमी करायला जिल्हा दारुमुक्तीचे प्रयत्न हवेत.”

संबंधित बातम्या :

BLOG: लोकलढा दारूमुक्तीचा : ‘दारू’कारण

सरकारला कोरोनापेक्षा दारूबंदी मोठी आपत्ती वाटते का? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांचा सवाल

‘गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कायम ठेवा’, राज्यातील 40 कलावंत, विचारवंतांचे मुख्यमंत्री आणि पवारांना आवाहन

संबंधित व्हिडीओ :

Zero death due to Poisonous Alcohol Gadchiroli Police Department inform Dr Abhay Bang