MOVIE REVIEW DHURALA : शह-काटशहाचा खेळ ‘धुरळा’

वर्ष 2019 हे गाजवलं ते विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं रंगलेल्या राजकीय 'धुराळ्या'नं. दिवाळीनंतर महाराष्ट्रात महिनाभर रंगलेला सत्तेच्या सारीपाटाचा खेळ सगळ्यांनी (Movie Review Dhurala) अनुभवला.

MOVIE REVIEW DHURALA : शह-काटशहाचा खेळ 'धुरळा'
Follow us
| Updated on: Jan 03, 2020 | 9:56 PM

वर्ष 2019 हे गाजवलं ते विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं रंगलेल्या राजकीय ‘धुराळ्या’नं. दिवाळीनंतर महाराष्ट्रात महिनाभर रंगलेला सत्तेच्या सारीपाटाचा खेळ सगळ्यांनी (Movie Review Dhurala) अनुभवला. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘धुरळा’ उडाला आहे. पण हा ‘धुरळा’ राजकीय नाही तर फिल्मी आहे. हा फिल्मी ‘धुरळा’ उडवणारे शिलेदार अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अलका कुबल-आठल्ये, अभिनेता सिध्दार्थ जाधव, अमेय वाघ आणि प्रसाद ओक. राजकारणात कोणी कोणाचं नसते. रक्ताची नातीही बऱ्याचदा सत्तेच्या मोहापायी एकमेकांविरोधात बंड उभारतात. महाराष्ट्रानंही विधानसभा निवडणुकीत हा अनुभव जवळून घेतला. हेच सगळं दिग्दर्शक समीर विद्वंसनं ‘धुरळा’ सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खुर्चीच्या हव्यासापोटी नाती विसरुन हा शह-काटशहाचा खेळ किती खालच्या थराला जाऊ शकतो याची प्रचिती हा सिनेमा बघताना येते. बऱ्याच वर्षांनी मराठीत उत्तम राजकीय चित्रपट (Movie Review Dhurala) आला आहे.

सिनेमाची कथा आहे आंबेगावातील उभे कुटुंबाची. उभे कुटुंबातील मोठा मुलगा नवनाथ उभे उर्फ दादा (अंकुश चौधरी) आपल्या वडिल निवृती उभेंच्या निधनानंतर सरपंचपदाचा प्रमुख दावेदार असतो. आपणच सरपंच होणार याची दादाला पूर्ण खात्री असते. पण त्या गावचा आमदार (उदय सबनीस) असे काही फासे टाकतो की दादाची सावत्रआई ज्योती उभे उर्फ अक्का (अलका कुबल-आठल्ये) ना सरपंच पदाची उमेदवारी मिळते. दुसरीकडे हरीष गाढवे (प्रसाद ओक)लाही सरपंच बनायचं असते. त्यामुळे उभे कुटुंबाला मात देण्यासाठी साम-दाम-दंड भेदनुसार काहीही करायची त्याची तयारी असते. बरं गाढवे हा तर बाहेरचा शत्रू, पण उभे कुटुंबात घरातलेच भेदी बरेच असतात. कोणाला सरपंच व्हायचंय तर कोणाला किंगमेकर. कोणी वजीर बनतो तर कोणी ‘मामा’. अशातच आमदार साहेब अजून एक फास आवळतात. त्यामुळे दादाला धक्का बसतो. आता सत्तेच्या या बुध्दीबळात दादाची बायको हर्षदा (सई ताम्हणकर), हनुमंतराव उर्फ शिमेंट शेट (सिध्दार्थ जाधव), त्याची बायको मोनिका (सोनाली कुलकर्णी) आणि भावज्या (अमेय वाघ) सगळेच आपल्या चाली खेळतात. त्यामुळे सरपंच पदासाठीचा हा सामना तिरंगी बनून अक्का, हर्षदा आणि मोनिका यांच्यात थेट लढत रंगते आणि मग सुरु होतो शह-काटशहाचा खेळ. आता हा खेळ कोण जिंकतो? असं काय घडतं की अक्का, हर्षदा, मोनिका एकमेकांसमोर उभ्या राहतात? आमदारांची कोणती खेळी दादावर भारी पडते? सत्तेच्या सारीपाटात कोणाचं पारडं जड असतं ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला ‘धुरळा’ बघावा लागेल.

एकाच घरातील तीन महिला निवडणुकीच्या आखाड्यात एकमेकांसमोर आल्यानंतर उडणारा ‘धुरळा’ खरचं खुर्चीला खिळवून ठेवतो. चित्रपटाचा पूर्वार्धात पात्रांची ओळख, निवडणुकीची पार्श्वभूमी, प्रत्येत पात्राचा स्वत:चा काय स्वार्थ असतो, महत्त्वाकांक्षा काय असते हे दाखवलंय. त्यामुळे कुठेतरी सिनेमाची गती मंदावल्यासारखी वाटते. उत्तरार्धात मात्र सिनेमा ग्रीप पकडतो. राजकारणातील शह-काटशहाचा खेळ रंगायला सुरुवात होते. पण या सगळ्यात मला एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की सिनेमाची लांबी तब्बल 2 तास 50 मिनिटं आहे. सिनेमातील काही अनावश्य प्रसंग टाळून जर सिनेमाची लांबी थोडी कमी केली असती तर हा सिनेमा अजून क्रिस्पी झाला असता. राजकारणाच्या आखाड्यात आपण कितीही तीस मार खान असलो तरी कौटुंबिक आयुष्यात हा ‘म’ मिसळला तर काय आघात होऊ शकतो. यावरही दिग्दर्शक समीर विद्वंस आणि लेखक क्षितीज पटवर्धन या जोडीनं प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकारांची भली मोठी फौज सिनेमात असूनही प्रत्येक पात्रावर समीरनं डिटेल अभ्यास केला आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र सिनेमात आपली स्वतंत्र ओळख जपतं, हेच समीरचं यश म्हणावं. समीर-क्षितिज ही जोडी एकत्र आली म्हणजे मोठ्या पडद्यावर जोरदार फटकेबाजी करते. यावेळी तर या जोडीकडे आघाडीची टीम आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावरील ही फटकेबाजी नेत्रदीपक झाली आहे. सगळ्यांनी अगदी पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत चेंडू फक्त सीमा रेषेबाहेरच भिरकावला आहे. आता थोडं लांबी जास्त असल्यामुळे काही प्रसंगाना ड्रिंक्स ब्रेक झाल्यासारखं वाटतं, पण पुन्हा एकदा गाडी परत रुळावर येते आणि आपण फ्रेश होतो. छोट्या छोट्या गोष्टींचा समीर-क्षितिज जोडीनं बारकाईनं अभ्यास केलाय. बरेच प्रसंग बघतांना हे जाणवतं. सिनेमाचा शेवट डोळ्यात अंजन घालणारा आहे.

सिनेमात सगळ्याच कलाकारांनी दमदार कामं केली आहेत. बेरक्या पण तितकाच हळवा दादा अंकुशनं उत्तम वठवला आहे. गावासाठी काही तरी करायचंच ही त्याची तळमळ बऱ्याच प्रसंगात दिसते. हर्षदाच्या भूमिकेत सई ताम्हणकर लाजवाब. प्रत्येक प्रसंगात नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी, समजूतदार, वेळ पडल्यास तितकीच खमकी हर्षदा लक्षात राहते. ‘हिरकणी’ आणि ‘विक्की वेलिंगकर’नंतर सोनाली कुलकर्णीनं याही सिनेमात फुल फॉर्मात बॅटिंग केली आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा बासनात गुंडाळून शिमेंट शेटशी लग्न केलेली मोनिका, संधी मिळताच ती हेरुन राजकारणाच्या आखाड्यात उतरलेली मोनिका तिनं उत्तम वठवली आहे. हनुमंत राव अर्थात शिमेंट शेटच्या भूमिकेत सिध्दार्थ जाधव कमाल. खरंतर या सिनेमात हेच पात्र जास्त हसवतं, आणि शेवटी हेच पात्र डोळ्यात पाणी आणतं. साधाभोळा शिमेंट शेट सिध्दूनं सफाईदारपणे रंगवला आहे. भावज्याच्या भूमिकेत अमेय वाघनं जान आणली आहे. बऱ्याच प्रसंगात तर तो फक्त डोळ्यांनी बोलतो. ज्योती उभे उर्फ अक्काच्या भूमिकेत अलका ताईंनी आपली चौकोट मोडण्याचा प्रयत्न केला आहे. इच्छा नसतांनाही राजकारणाच्या आखाड्यात उतरावं लागणाऱ्या अक्का ते आता काहीही झालं तरी आपणचं जिंकायचं हा चंक बांधलेल्या अक्का त्यांनी उत्तम साकारल्या आहेत. प्रसाद ओकनेही बेरक्या, धूर्त हरीष गाढवेच्या भूमिकेत कमाल केली आहे. सिनेमात या सगळ्याच कलाकारांची जुगलबंदी बघण्यासारखी आहे.

आकाश अग्रवालची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. आंबेगाव त्यानं कॅमेऱ्यात उत्तम कैद केलंय. एव्ही प्रफुलचंद्रचं संगीत भन्नाट आहे. ‘नाद करायचा नाही’ आणि ‘धुरळा’ ही गाणी आधीच हिट झालीत. एकूणच काय तर कलाकारांचा दमदार अभिनय आणि राजकीय चित्रपटांची आवड असणाऱ्यांसाठी ‘धुरळा’ ट्रीट आहे. ‘टीव्ही 9 मराठी’कडून या सिनेमाला मी देतोय साडे तीन स्टार्स.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.