REVIEW : चांगला होता होता राहिला...'ब्लँक'

गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये स्टार किड्सला लाँच करण्याचा ट्रेंडच सुरु आहे. आता यामध्ये एका स्टारकिड्सची भर पडली आहे. डिंम्पल कपाडियाचा भाचा आणि सिंपल कपाडियाचा मुलगा करण कपाडिया. बॉलिवूडमध्ये कुठल्या स्टारकिड्सचा डेब्यू करायचा असेल तर त्याच्यासाठी एकतर प्रेमकथा अथवा अक्शन सिनेमाचा घाट घातला जातो. करणलाही याच परंपरेअंतर्गत ‘ब्लँक’ या अक्शन-थ्रिलर सिनेमातून बॉलिवूडमध्ये लाँच करण्यात आलंय. दिग्दर्शक …

REVIEW : चांगला होता होता राहिला...'ब्लँक'

गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये स्टार किड्सला लाँच करण्याचा ट्रेंडच सुरु आहे. आता यामध्ये एका स्टारकिड्सची भर पडली आहे. डिंम्पल कपाडियाचा भाचा आणि सिंपल कपाडियाचा मुलगा करण कपाडिया. बॉलिवूडमध्ये कुठल्या स्टारकिड्सचा डेब्यू करायचा असेल तर त्याच्यासाठी एकतर प्रेमकथा अथवा अक्शन सिनेमाचा घाट घातला जातो. करणलाही याच परंपरेअंतर्गत ‘ब्लँक’ या अक्शन-थ्रिलर सिनेमातून बॉलिवूडमध्ये लाँच करण्यात आलंय. दिग्दर्शक बेहजाद खंबाटाने अनुभवी सनी देओल, करणवीर-इशिता दत्तासारखे तरुण कलाकार घेऊन बरा सिनेमा बनवलाये पण जर त्याने कथेवर अजून मेहनत घेतली असती तर नक्कीच एक उत्तम चित्रपट झाला असता.

चित्रपटाची कथा इंटरेस्टिंग आहे… हनीफ (करण कपाडिया) मुंबईतील 24 वेगवेगळ्या भागात सीरिअल बॉम्ब ब्लास्ट घडवण्याच्या तयारीत असतो, पण नेमका त्याचवेळी त्याचा अपघात होतो. त्याला रुग्णालयात दाखल केलं जातं तेव्हा तो ‘सुसाईड बॉम्बर’ असल्याचा खुलासा होतो. हनीफचा एन्काऊंटर करण्याचे आदेश दिले जातात. एटीएस चीफ एसएस दीवान (सनी देओल) आपली टीम हुस्ना ( ईशिता दत्ता) आणि रोहित (करणवीर शर्मा) सोबत या केसची सूत्र आपल्या हातात घेतो. हनीफच्या शरीरावर असणाऱ्या बॉम्बचे तार अन्य 24 लोकांशीही कनेक्ट असल्याचा धक्कादायक खुलासा यादरम्यान होतो. जर हनीफचं हृदय बंद पडलं तर तार कनेक्ट असल्यामुळे 24 बॉम्बही फुटणार असतात. आतंकवादी मकसूदने (जमील खान) धर्माच्या नावाखाली मुंबईत 25 ठिकाणी एकाचवेळी बॉम्बस्फोट घडवण्याचा हा जीवघेणा कट आखलेला असतो. आता हनीफचा एन्काऊंटर होतो का? हनीफ मुंबईत 25 बॉम्बस्फोट घडवण्यात यशस्वी होतो का? हनीफचा भूतकाळ काय असतो? तरुण हनीफ सुसाईड बॉम्बर का बनतो? दीवान या सगळ्या गोष्टींचा सामना कसा करतो? हे बघण्यासाठी तुम्हाला ब्लँक बघावा लागेल.

दिग्दर्शक बेहजाद खंबाटाने चित्रपटाची सुरुवात जोरदार केली आहे. मध्यंतरापर्यंत चित्रपट तुम्हाला पूर्णपणे कथेत गुंतवून ठेवेल. पण मध्यंतरानंतर दिग्दर्शकाची चित्रपटावरील पकड सुटते. जेहाद, आतंकवाद यासारख्या विषयांवर याआधीही सिनेमे बनलेत. यामुळेच दिग्दर्शक शेवटपर्यंत सिनेमावर पकड ठेवण्यात अयशस्वी ठरलाय. बऱ्याच सिनेमांमध्ये बघितलेले प्रसंग तुकड्या तुकड्यांमध्ये या सिनेमात दिसतात. चित्रपटाचा शेवट मात्र धक्कादायक आहे. चित्रपटाचा सस्पेन्स तुम्हाला शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवेल. चित्रपटातील चेसिंग सीन आणि संवादही उत्तम आहेत. बेहजादने सिनेमाची गती उत्तम ठेवल्यामुळे हा सिनेमा बघतांना बोर होत नाही, पण सिनेमातील बऱ्याच गोष्टी अनाकलनीय वाटतात. तसेच सिनेमातील काही प्रश्नांची उत्तरं मात्र अनुत्तरित राहतात. सिनेमा संपल्यानंतरही आपण ती उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो. मुंबईकरांचं स्पिरिट, सरकारी यंत्रणांचा सुस्तावलेला कारभार, धर्माच्या नावाखाली लहान मुलांना कशा पद्धतीने दहशतवादाचा मुखवटा चढवला जातो अशा अनेक गोष्टींवर या सिनेमात भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. परंतु यातली कुठलीही गोष्ट आवश्यक परिणाम साधत नाही. सिनेमात दिवानच्या मुलाचाही ट्रॅक आहे. रेव्ह पार्टीत त्याच्या मुलाला अटक होते. पोलीस त्याच्यावर कारवाईही सुरु करतात. आता सिनेमात हा ट्रॅक नसता दाखवला असता तरी चाललं असतं. पण हा ट्रॅक दाखवूनही सिनेमा संपेपर्यंत दिवानच्या मुलाचं शेवटी काय होतं हे दाखवण्याचं कष्ट दिग्दर्शकाने घेतलेलं नाही.

एटीएस प्रमुख दिवानच्या भूमिकेत सनी देओल फिट बसलाय. बऱ्याच दिवसांनी सनीच्या चाहत्यांना त्याचं जुनं रुप बघायला मिळेल. सनीच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा उत्तम ट्रीट आहे. हनीफच्या भूमिकेत करण कपाडियाने अक्शन सीनमध्ये प्रभावी केलंय. पण अभिनयाच्या बाबतीत मात्र त्याची पाटी कोरीच आहे. प्रत्येक दृश्यात त्याच्या चेहऱ्यावर फक्त एकच एक्सप्रेशन दिसतात. करणवीर शर्माने एटीएस ऑफिसर रोहितच्या भूमिकेत चांगलं काम केलंय. एटीएस ऑफिसर हुस्नाच्या भूमिकेत मुळातच ईशिता दत्ता शोभली नाही. तिच्याकडे करण्यासारखंही काही नव्हतं. आतंकवादी मकसूदच्या भूमिकेत जमाल खानने ठीकठाक काम केलंय. सनी देओलच्या बायकोच्या भूमिकेत किशोरी शहाणे-वीज दिसल्या आहेत. मात्र त्यांच्या वाट्याला केवळ एकच सीन आलाय. त्यांच्या पात्राचंही पुढे काय होतं हे फक्त लेखक-दिग्दर्शकाला माहित. किशोरी शहाणे यांनी हा सिनेमा स्वीकारला नसता तरी चाललं असतं. सिनेमात गाण्यांना वाव नव्हता तरीही सिनेमात दोन गाणी घुसवण्याचा अट्टहास करण्यात आलाय. ही दोन्ही गाणी लक्षात राहत नाही. सिनेमाच्या शेवटी अक्षय कुमार आणि करण कपाडियावर चित्रीत करण्यात आलेलं ‘अली अली’ हे गाणं बघुन हसू येतं.

एकूणच काय जर तुम्ही खुप अपेक्षा न ठेवता हा सिनेमा बघितला तर हा सिनेमा तुमचं मनोरंजन करेल असं मला वाटतं. ‘टीव्ही नाईन मराठी’कडून मी या सिनेमाला देतोय 2.5 स्टार्स..

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *