मुंबईत स्कार्पिओत अडकून दोघांचा मृत्यू, काचा फोडून 6 तासांनी मृतदेह बाहेर काढले

मालाड सब वेमध्ये पाण्यात अडकलेल्या स्कॉर्पिओमधील दोघांचा दुदैर्वी मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे गाडीच्या काचा फोडून तब्बल 6 तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले.

मुंबईत स्कार्पिओत अडकून दोघांचा मृत्यू, काचा फोडून 6 तासांनी मृतदेह बाहेर काढले

मुंबई : मुंबईतील पाऊस अनेकांसाठी जीवघेणा ठरत आहे. कारण तुफान पावसामुळे अनेकांचा जीव गेला आहे. मालाडमध्ये मध्यरात्री भिंत कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 150 घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. या दुर्घटनेत अनेक लोकं जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

याशिवाय भयंकर म्हणजे मालाड सब वेमध्ये पाण्यात अडकलेल्या स्कॉर्पिओमधील दोघांचा दुदैर्वी मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे गाडीच्या काचा फोडून तब्बल 6 तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. इरफान खान (38) आणि गुलशाद शेख (35) अशी स्कॉर्पिओत मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने पहाटे 4 च्या सुमारास स्कॉर्पिओ बाहेर काढली.

मुंबईच्या मालाड भुयारी मार्गावर पाणी भरले असताना, या पाण्यात एक गाडी त्यात अडकली होती. वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या स्कॉर्पिओत इरफान आणि गुलशाद होते. मात्र या गाडीतच त्या दोघांचा मृत्यू झाला. या दोघांचे मृतदेह गाडीच्या काचा फोडून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर हे मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले.

मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मालाड सबवे इथे 10 ते 12 फूट पाणी साचले होते. असं असताना देखील या ब्रिज खालून स्कॉर्पिओने प्रवास करणाऱ्या दोघांना जीव गमवावा लागला आहे. या थरारक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईत जोरदार पाऊस

दरम्यान, मुंबईसह उपनगरात गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. मालाड सब वे मध्ये 10 ते 12 फूट इतकं पाणी भरलं आहे. अनेक वाहनचालक त्यातूनच गाड्या घालत आहेत. त्यामुळे बऱ्याच गाड्या पाण्यात बुडलेल्या स्थितीत आहेत.

मुंबईत सुट्ट्या जाहीर

मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. जोरदार पावसामुळे मुंबईसह इतर सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पावसाचा जोर पाहता प्रशासनाने मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यात सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.  मुंबई विद्यापीठाच्या ज्या परीक्षा होत आहेत, त्या परीक्षाही रद्द करण्यात आल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *