'...तर कठोर कारवाई करण्यात येईल', कामचुकार अधिकाऱ्यांना अजित पवारांचा इशारा

आपल्या जबाबदारीचं भान न ठेवता कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता झटका बसणार आहे (Deputy Chief Minister Ajit Pawar).

Deputy Chief Minister Ajit Pawar, ‘…तर कठोर कारवाई करण्यात येईल’, कामचुकार अधिकाऱ्यांना अजित पवारांचा इशारा

मुंबई : आपल्या जबाबदारीचं भान न ठेवता कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता झटका बसणार आहे. कारण अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी दिला आहे. ‘कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असं अजित पवार मंत्रालयात सुरु असलेल्या एका बैठकीत म्हणाले.

सेवाग्राम-पवनार-वर्धा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्र्यांनी वर्धा, सेवाग्राम आणि पवनार परिसराचं राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन विकासकामांना वेग द्यावा. कामांच्या दर्जाशी तडजोड करु नये. या कामाचे महत्व लक्षात घेऊन जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना दिल्या.

या बैठकीला वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार, आमदार पंकज भोयर आदींसह जिल्हा आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

“राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सेवाग्राम-पवनार-वर्धा विकासाअंतर्गत सुरु करण्यात आलेली कामे 2 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करावीत. ही कामे दर्जेदार होतील याकडे पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी व्यक्तीश: लक्ष घालावे. महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या व्यक्तिमत्वातली महानता या सर्व कामांमध्ये प्रतिबिंबित व्हावी”, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

याशिवाय “या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, गरज लागेल तसा निधी उपलब्ध करुन दिला जाईल”, असा विश्वास अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी व्यक्त केला. यावेळी सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत तसेच ‘गांधी फॉर टुमॉरो’ या गांधी विचार संशोधन आणि संसाधन केंद्रासंदर्भात सादरीकरण करण्यात आले.

“वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम आणि पवनार आश्रमांसह अनेक ऐतिहासिक संस्था, संघटना, व्यक्ती सामाजिक काम करत आहेत. त्यांच्या कामांची ओळख सर्वांना व्हावी, तसंच या निमित्ताने पर्यटनाची नवी संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. वर्धा विकास आराखड्यांतर्गत गांधी विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी, तसेच येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध सोयी-सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. या कामांसाठी शासन आवश्यक निधी उपलब्ध करुन देत असताना कामाचा दर्जा राखण्याची अपेक्षा आहे”, असं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

वर्धा शहरातील, जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, निवासस्थाने, पर्यटनस्थळांच्या ठिकाणी स्वच्छतेवर विशेष भर देण्याच्या सुचनाही अजित पवार यांनी दिल्या. वर्धा विकास आराखड्याच्या पाहणीसाठी आपण स्वत: नियमित भेट देणार असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले. जिल्हा विकास योजनेंतर्गत नागपूरला १०० कोटी आणि वर्ध्याला २५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात आल्याची माहितीही त्यांनी या बैठकीत दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *