देशातील पहिली इलेक्ट्रीक बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल

देशातील अशा पहिल्या बसचं (Electric ST bus) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात लोकार्पण करण्यात आलं.

देशातील पहिली इलेक्ट्रीक बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल

मुंबई : एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता इलेक्ट्रीक बस (Electric ST bus) दाखल झाली आहे. देशातील अशा पहिल्या बसचं (Electric ST bus) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात लोकार्पण करण्यात आलं. एकदा चार्ज केल्यानंतर किमान 300 किमीचा पल्ला गाठणारी ही बस जवळच्या दोन शहरांमध्ये चालवली जाणार आहे.

एसटीमध्ये लवकरच अशा साधारण 150 बसेस दाखल होणार आहेत. ‘पर्यावरणस्नेही बसेस एसटी महामंडळात दाखल करण्याची सुरुवात करुन दिवाकर रावते यांनी एसटीचा कायापालट करण्याच्या दिशेने आणखी एक महत्वाचं पाऊल टाकलं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘शिवनेरी, शिवशाही आणि विठाई बसच्या यशानंतर विद्युत बस ही ‘शिवाई’ नावाने ओळखली जाईल’, अशी घोषणा रावते यांनी केली.

विद्याविहारला एसटी कर्मचाऱ्यांसाठी सेवा निवासस्थाने, अत्याधुनिक शाळा

विद्याविहार येथे एसटी कर्मचाऱ्यांसाठी सेवा निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. तेथील विभागीय कार्यालय आणि विभागीय कार्यशाळेचा पुनर्विकास केला जाईल. याबरोबरच एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी तेथे अत्याधुनिक शाळा उभारली जाणार आहे. या कामाचं भूमीपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रकल्पात 12 मजली दोन इमारती बांधण्यात येणार आहेत. त्यात एसटी कर्मचाऱ्यांसाठी 118 सदनिका असतील.

मुंबई सेंट्रलला एसटीची 49 मजली इमारत

मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मुख्यालयाची इमारत, बसस्थानक आणि आगाराचीही पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. या कामाचं भूमीपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी 49 मजली इमारत उभारण्यात येणार असून त्यातील आठव्या मजल्यापर्यंत पार्किंगची सुविधा असेल. 9 ते 14 व्या मजल्यापर्यंत एसटी महामंडळाचं मुख्यालय असेल. 15 ते 49 वे मजले सरकारच्या विविध विभागांना भाड्याने देणे प्रस्तावित आहे. त्यातून महामंडळाला अंदाजे 16.17 कोटी रुपये उत्पन्न प्रती महिना मिळू शकेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *