महाराष्ट्रातील धरण परिसरात कृत्रिम पाऊस पाडणार : चंद्रकांत पाटील

  • राहुल झोरी, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 15:56 PM, 28 May 2019

मुंबई : दुष्काळावर उपाय म्हणून राज्य सरकार लवकरच कृत्रिम पावसाचे प्रयोग करणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. कृत्रिम पावसाचे हे प्रयोग जास्तीत जास्त मराठवाड्यात करण्यात येतील, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “शेतकऱ्यांना हवामानाविषयी सर्व माहिती दिली जात आहे. याआधी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कृत्रिम पाऊसाचे प्रयोग करण्यात आले होते. त्या प्रयोगाचा आपल्याला फायदाही झाला होता. त्यामुळे कृत्रिम पावसाचे प्रयोग पुन्हा करण्यात येतील. मराठवाड्यात हा प्रयोग अधिकाधिक केला जाईल. यासाठी साधारण 30 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा पाऊस धरण परिसरात पाडण्यासाठी प्रयत्न केले जातील. या कृत्रिम पावसासाठी निविदाही मागवल्या आहेत.”

‘शेळ्या मेंढ्यांसाठीही चारा छावणी सुरु करणार’

राज्यात शेळ्या मेंढ्यांसाठीही चारा छावणी सुरु करणार असल्याची माहिती यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली. अशा छावण्या चालवण्यासाठी ज्या संस्था पुढे येतील. त्यांना छावण्यांसाठी 25 रुपये प्रती शेळी/मेंढी अशी तरतुद केली जाईल. चारा छावण्यांना सरकारच पाणी पुरवणार आहे. चारा छावण्यांना परवानगी देताना राजकारण करणार नाही. जो कोणी प्रस्ताव देईल, त्याला परवानगी देऊ, असेही पाटील यांनी सांगितले.