मुंबईत मराठी माणसं दहा टक्क्यांनी घटली, यूपी, बिहारींची संख्या लाखांमध्ये वाढली

मुंबईत मराठी माणसं दहा टक्क्यांनी घटली, यूपी, बिहारींची संख्या लाखांमध्ये वाढली

मुंबई : एकेकाळी मुंबई कुणाची अशी आरोळी आसमंतात घुमायची आणि एकच जयघोष व्हायचा. पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. मराठी मतांचं राजकारण करणाऱ्या सर्वच पक्षांनी मराठी माणसाकडे दुर्लक्ष केलं, परिणामी मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झालाय. गेल्या आठ वर्षात मुंबईतला मराठी माणसाचा टक्का घसरलाय आणि हिंदी भाषिकांचा वाढलाय. तोही तब्बल दहा पटीने. मुंबई आता मराठी भाषिकांची राहिलीच नाही, असं म्हणण्याची वेळ आली आहे.

होय, हे खरंय. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झालाय. गेल्या 15 ते 20 वर्षात ही प्रक्रिया हळूहळू झाली. मराठी भाषेचा इतिहास आणि मराठी राज्याची राजधानी ही मुंबईची ओळख आता हळूहळू पुसट होत चालली आहे. काही वर्षांपूर्वी मराठी पाऊल पडते पुढे, ठाणे विरार कल्याणकडे, असं उपरोधिक गाणं तरुण पिढी गात होती. याचा प्रत्यय अलिकडच्या काळात येऊ लागलाय. जागेची अडचण, विभक्त कुटुंब पद्धती यामुळे चाळीत दाटीवाटीने राहणारा मराठी माणूस सुरुवातीला ठाणे, नालासोपरा, डोंबिवली, कल्याण या भागात स्थलांतरित झाला आणि मराठी माणसांच्या मुंबईचा हिंदी भाषिकांचे शहर म्हणून प्रवास सुरु झाला. याचा परिणाम हा लोकसभा, विधानसभा निवडणुकांबरोबरच महापालिका निवडणुकीवरही होताना दिसलाय. मराठीचा टक्का घसरल्याने शिवसेनेला भाजप वरचढ ठरत आहे. याबाबतचे चित्र गेल्या निवडणुकांमध्ये स्पष्ट झालं.

मुंबईतील पारंपरिक कोळ्यांच्या व्यवसायातही हिंदी भाषिक शिरले. रोजगारीच्या अनेक क्षेत्रात उत्तर भारतीय, हिंदी भाषिक असल्याने मुंबईत सहाजिकच त्यांची टक्केवारी वाढली.

2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार हिंदी भाषिकांचा आकडा हा 40 टक्क्यांनी वाढलाय.  2001 मध्ये ही संख्या 25.88 लाख होती, तीच दहा वर्षांत 35.98 लाख झाली आहे. म्हणजे 10 वर्षांत तब्बल 10 लाख हिंदी भाषिकांची संख्या वाढली. तर मराठी भाषिकांमध्ये 2.64 टक्क्यांची घट नोंदविली गेली आहे. 2001 मध्ये 45.23 लाख मराठी मातृभाषिक होते, तेच 2011 मध्ये 44.04 लाख झाले आहेत.

ही लोकसंख्या 2011 मधील असली तरीही गेल्या आठ वर्षांमध्ये मराठी भाषिकांचा उपनगरांकडचा प्रवास मोठ्या प्रमाणावर वाढलाय. यामुळे 2021 च्या जनगणनेमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर येण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यात मराठी भाषिकांची संख्या 80.45 टक्के, तर रायगड जिल्ह्यात 87 टक्के आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईतील मराठी टक्का घटला.  त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये हिंदी भाषिकांची मते ही हुकमी एक्का ठरणार आहेत.

डिपार्टमेंट ऑफ मायग्रेशन अँड अर्बन स्टडीज ऑफ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑप पॉप्युलेशन सायन्सचे राम बी भगत यांनी त्यांच्या “Population Change and Migration in Mumbai Metropolitan Region: Implications for Politics and Governance” या अभ्यासात मराठी टक्का घसरल्याची माहिती नोंदवली आहे. या अभ्यासानुसार, महाराष्ट्रातून मुंबईत येणारांची संख्या 1961 मध्ये 41.06 टक्के होती, जी 2001 मध्ये 37.4 टक्के झाली. तर याच काळात उत्तर प्रदेशातून येणारांची संख्या 1961 मध्ये 12 टक्के होती, ती 24 टक्के म्हणजे दुप्पट झाली. बिहारमधून येणारांची संख्या 0.2 टक्के होती, ती तब्बल 3.5 टक्क्यांवर गेली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *