देवरांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय उत्तम : संजय निरुपम

मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन काढण्याबाबत राष्ट्रीय काँग्रेसने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य होता. ते कार्यक्षम नव्हते आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासही सक्षम नाहीत, अशा शब्दात मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी आपल्या मनातील असूया व्यक्त केली आहे

देवरांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय उत्तम : संजय निरुपम

मुंबई : मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय अतिशय योग्य होता, ते जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले, असा टोला मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी लगावला आहे. निरुपम यांच्या ट्वीटमुळे मुंबई काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर आली आहे. माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

‘मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन काढण्याबाबत राष्ट्रीय काँग्रेसने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य होता. ते कार्यक्षम नव्हते आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासही सक्षम नाहीत. विधानसभा निवडणुका अवघ्या 40 दिवसांवर आहेत. शिवसेना भाजपशी तुल्यबळ स्पर्धा करण्यासाठी विद्यमान अध्यक्षांनी प्रत्येकाला विश्वासात घ्यायला हवं’ असं मत संजय निरुपम यांनी ट्विटरवर व्यक्त केलं आहे.

मुंबईतील लोकसभा पराभवाची जबाबदारी स्वीकारत मिलिंद देवरा यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्याआधी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद, तर अशोक चव्हाण यांनीही महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. लोकसभेच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला होता.

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी एकाही जागेवर काँग्रेसला विजय मिळवता आला नव्हता. मिलिंद देवरा, संजय निरुपम, एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त आणि उर्मिला मातोंडकर अशा सर्वच दिग्गजांना पराभवाची धूळ चाखावी लागली होती.

2014 मध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. त्याआधी मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईतून खासदारकी मिळवली होती. यंदाही काँग्रेसकडून मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून रिंगणात उतरले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत पुन्हा सावंत यांच्याकडून देवरांचा दारुण पराभव झाला.

दुसरीकडे, शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी संजय निरुपम यांचा पराभव केला होता. संजय निरुपम यांना काँग्रेसकडून उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देत मुंबई अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं होतं. मुंबई काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या गटबाजीमुळे पक्षातील अनेक वाद चव्हाट्यावर आले होते. याच पार्श्वभूमीवर निरुपम यांना पदावरुन हटवण्यात आल्याची चर्चा होती. निरुपम यांच्या जागी मिलिंद देवरा यांची वर्णी लागली होती. आता देवरांविषयी असलेली निरुपम यांच्या मनातील असूया समोर आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *