मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, मनसे मोदींना 10,000 पोस्टकार्ड पाठवणार

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सक्रिय झाली आहे. अभिजाततेचा दर्जा देण्यासाठी दबाव वाढावा म्हणून मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना 10 हजार पोस्टकार्ड पाठण्याची घोषणा केली.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, मनसे मोदींना 10,000 पोस्टकार्ड पाठवणार

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सक्रिय झाली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा देण्यासाठी दबाव वाढावा म्हणून मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना 10 हजार पोस्टकार्ड पाठण्याची घोषणा केली. मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी याबाबत माहिती दिली.

तमिळ, संस्कृत, तेलगु, कन्नड, मल्याळम, उडीया या 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषेबाबतही सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भाषा तज्ज्ञांच्या समितीने या विषयावर सखोल अभ्यास करत अनेक पुरावे आणि संदर्भांचा आधार घेतला आहे. त्यानंतर केंद्र सरकारला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची एकमताने शिफारस केली. मात्र, साडेचार वर्षे उलटूनही अद्याप यावर निर्णय झालेला नाही.

भाषा तज्ज्ञांच्या शिफारसीनंतरही केंद्र सरकार मराठीला अभिजाततेचा दर्जा देण्याची घोषणा करायला टाळाटाळ करत आहे, असा आरोप मनसेने केला आहे. म्हणूनच मनसे पंतप्रधान नरेंद्र मोदींना 10 हजार पोस्टकार्ड पाठवून तात्काळ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी करणार असल्याचे काळे यांनी सांगितले.

केंद्राच्या तज्ज्ञ पठारे समितीने आपल्या अहवालात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक कागदपत्रे, पुरावे, सादर केली आहेत. तरीही राज्य सरकार केंद्रावर दबाव टाकत नाही. त्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव अजून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे, असाही आरोप काळे यांनी केला.

“दक्षिणेकडून आपण भाषाप्रेम शिकायला हवे”

तमिळ आणि इतर दक्षिणी भाषांकडे पाहून आपण भाषाप्रेम शिकायला हवे, असे मत पठारे समितीचे समन्वयक हरी नरके यांनी व्यक्त केले होते. यापुढे राजकीय दबाव निर्माण करण्याचे काम, नागरिकांचे आहे, असेही त्यांनी सांगितले होते. याचप्रमाणे केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मनसेने पोस्टकार्ड मोहीमेतून पाऊल उचलल्याचे दिसत आहे.

“नवी मुंबईच नाही, तर महाराष्ट्रातील जनतेने मराठी भाषेसाठी पुढाकार घ्यावा”

नवी मुंबईतीलच नाही, तर महाराष्ट्रातील जनतेनेही मनसेच्या मोहिमेला प्रतिसाद द्यावा आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासाठी आपले मत पोस्ट कार्डवर लिहून मोदींना पाठवावे, असे आवाहन  गजानन काळे यांनी केले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *