ईद-ए-मिलाद, मुंबईत 40 हजारपेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा तैनात

आज ईद-ए-मिलाद (Eid-E-Milad) सणानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबईत पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

ईद-ए-मिलाद, मुंबईत 40 हजारपेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा तैनात

मुंबई : अयोध्या राम मंदिर आणि बाबरी मशीद खटल्याचा निकाल काल सर्वोच्च न्यायालयाने दिला (Ayodhya Verdict). या दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून मुंबई आणि उपनगरांत कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली. तसेच, जवळपास 45 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. तर आज ईद-ए-मिलाद (Eid-E-Milad) सणानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबईत पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

मुंबईत जवळपास 40 हजारपेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. यासाठी दंगल नियंत्रण पथक, सशस्त्र पोलीस दल त्याचबरोबर राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रक पथक, जलद प्रतिसाद पथक, बीडीडीएस, विशेष शाखा, गुन्हे शाखा, मुंबई वाहतूक विभाग आणि 1650 होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

ईद-ए-मिलाद सणानिमित्त भायखळा येथील खिलाफत हाऊस येथून निघणाऱ्या मिरवणुकीसाठी आणि शहरातील इतर मिरवणुकी आणि गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांनी नजर असणार आहे. तसेच, साध्या वेशातील पोलीसही तैनात करण्यात येणार आहेत. तर, कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास पोलीस मदत क्रमांक 100 वर संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं गेलं आहे.

मुंबईत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, याची विशेष काळजी पोलिसांकडून घेण्यात येत आहे. मुंबई पोलिसांकडून शनिवारी (9 नोव्हेंबर) सकाळी लागू करण्यात आलेली जमाव बंदी आज सकाळी 11 वाजेपर्यंत असेल. मात्र, गरज पडल्यास ती आणखी वाढवण्यात येऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ईद-ए-मिलाद

इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी दरवर्षी ईद-ए-मिलाद हा सण साजरा केला जातो. यादिवशी ठिकठिकाणी मिरवणूक काढली जाते. मुस्लीम बांधव मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *