मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन करणारा जेरबंद, मुंबई ATS ची कोलकात्यात कारवाई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकीचे फोन केल्याप्रकरणी एकाला अटक झाली आहे

मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन करणारा जेरबंद, मुंबई ATS ची कोलकात्यात कारवाई

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे भासवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा अखेर जेरबंद झाला आहे. मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कोलकात्यातून एकाला अटक केली. (Mumbai ATS arrests Kolkata Man for threat calls to Mah CM Uddhav Thackeray)

दोन ते सहा सप्टेंबर या कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकीचे फोन केल्याचा आरोप आहे. 49 वर्षीय आरोपी हा कोलकात्यातील टोलीगंज भागात राहणारा जिम प्रशिक्षक असल्याची माहिती आहे.

आरोपी पलाश बोसला कोलकातामधून अटक केली असली, तरी तो काही वर्षांपूर्वही दुबईला होता. दुबईत याचे काही धागेदोरे सापडतात का? याचा तपास करत असल्याची माहिती एटीएसने पत्रकार परिषदेत दिली. तो कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नाही. मानसिकदृष्ट्या व्यवस्थित आहे, असेही एटीएसने सांगितले.

दुबईत कोणासोबत त्याचे संपर्क आहेत, त्याच्याकडे किती सिम कार्ड आहेत, कोणते अ‍ॅप आहेत, कोणत्या टीम किंवा गॅंगशी संबंध आहे का, याबाबत चौकशी सुरु आहे. आतापर्यंतच्या तपासात त्याचा कोणताही रेकॉर्ड असल्याचं सापडलं नाही, असेही एटीएसने सांगितले.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात भाष्य करणारी अभिनेत्री कंगना रनौतपासून लांब राहण्याची धमकी त्याने दिली होती. संजय राऊत यांच्याशी बोलणे झाले असता त्याने आपण कंगनाचा चाहता असल्याचे सांगितले होते. राऊत यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर कोलकात्यातील त्याचा ठावठिकाणा शोधण्यात आला.

आरोपीचे वकील अनिर्बन गुहा ठाकुर्ता यांनी दावा केला की, आपल्या अशिलाला अडकवण्यासाठी त्याचा आयपी अ‍ॅड्रेस हॅक करुन व्हीओआयपी (VoIP) कॉल करण्यात आला असावा. मात्र कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून मुंबई पोलिसांना आरोपीची चार दिवसांची कोठडी दिली आहे.

(Mumbai ATS arrests Kolkata Man for threat calls to Mah CM Uddhav Thackeray)

‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देण्याची धमकी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्याचे गेल्या रविवारी (6 सप्टेंबर) समोर आले होते. दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक बोलत असल्याचा दावा करणारा फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आला होता. त्यामुळे ‘मातोश्री’ निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली.

गेल्या शनिवारी रात्री 2 वाजता मातोश्रीवर फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने दाऊदला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असल्याचं सांगत कॉल ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र कॉल ऑपरेटरने फोन ट्रान्सफर केला नाही.

शरद पवार यांनाही भारताबाहेरुन धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. तर कंगना रनौतविषयी टिप्पणी केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही 9 ते 10 वेळा धमकीचे फोन आले.

संबंधित बातम्या :

आधी मुख्यमंत्र्यांना दुबईतून धमकी, आता ATS ची रायगडमध्ये मोठी कारवाई, तिघे ताब्यात

दाऊद इब्राहिमच्या नावे मुख्यमंत्र्यांना फोन, ‘मातोश्री’ उडवण्याची धमकी

(Mumbai ATS arrests Kolkata Man for threat calls to Mah CM Uddhav Thackeray)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *