ना सोनं ना पैसे-नाणी, मुंबईत चोरट्यांनी पळवल्या कांद्याच्या गोणी

सध्या 120 रुपये किलोच्या दरानुसार दोन्ही मिळून 21 हजार 160 रुपये किमतीचा कांदा चोरी झाला.

  • ब्रिजभान जयस्वार, टीव्ही9 मराठी, मुंबई
  • Published On - 8:46 AM, 11 Dec 2019

मुंबई : देशभरात कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असताना आता मुंबईत कांदाचोरीची घटना उघडकीस आली आहे. डोंगरी परिसरातून 21 हजार रुपये किमतीचा कांदा चोरीला (Mumbai Onion Theft) गेला.

देशात कांद्याच्या वाढत्या किमती थांबताना दिसत नाही. त्यातच आता कांद्याची चोरी सुरु झाल्याचं दिसत आहे. मुंबईतील डोंगरी परिसरात दोन दुकानांमध्ये कांदा चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंगरीमध्ये जेल रोडच्या बाजूला असलेल्या भाजी मार्केटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रहमत बी शेख कांदे-बटाटे विकतात. त्यांच्या स्टॉलवरुन 5 डिसेंबरच्या रात्री 8 वाजल्यानंतर अज्ञात इसमाने दोन गोणी कांदे चोरले.

दोन गोण्यांमध्ये 112 किलो म्हणजेच अंदाजे 13 हजार 440 रुपये किमतीचा कांदा होता. स्टॉलधारक रहमत बी यांचा मुलगा अकबर शेखने याप्रकरणी पोलिसात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.

आणखी एका स्टॉलवरुनही 56 किलो कांदा चोरी झाल्याचं समोर आलं आहे. सध्या 120 रुपये किलोच्या दरानुसार दोन्ही मिळून 21 हजार 160 रुपये किमतीचा कांदा चोरी झाला.

याबाबत डोंगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने दोघा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.