संगीतप्रेमींसाठी नजराणा, 'मुंबई संस्कृती' शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन

‘यूज लाईव्ह म्युझिक टू सेव्ह हेरीटेज’ या संकल्पनेअंतर्गत दिनांक 11 आणि 12 जानेवारी 2020 रोजी या वार्षिक महोत्सवाचे आयोजन इंडियन हेरीटेज सोसायटी, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Mumbai Sanskruti Festival, संगीतप्रेमींसाठी नजराणा, ‘मुंबई संस्कृती’ शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन

मुंबई : इंडियन हेरीटेज सोसायटी आणि महाराष्ट्र पर्यटन यांच्या सहकार्याने ‘मुंबई संस्कृती’ या शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 11 आणि 12 जानेवारी रोजी मुंबईतील एशियाटिक सोसायटीमध्ये हा संगीताचा मेळा जमणार (Mumbai Sanskruti Festival) आहे.

महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या अभिजात कला आणि संस्कृतीचे जतन करणे, मुंबईतील पुरातन ऐतिहासिक आणि उत्कृष्ट वास्तूकलेचा नमुना असलेल्या वारसा वास्तूची ओळख करुन देणे, तसेच मुंबई शहराला पर्यटनात्मक प्रसिद्धी देणे, हा या महोत्सवाच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.

यंदाच्या महोत्सवाचं हे 28 वं वर्ष असून ‘यूज लाईव्ह म्युझिक टू सेव्ह हेरीटेज’ या संकल्पनेअंतर्गत दिनांक 11 आणि 12 जानेवारी 2020 रोजी या वार्षिक महोत्सवाचे आयोजन इंडियन हेरीटेज सोसायटी, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे या महोत्सवाला महाराष्ट्र पर्यटनाचे विशेष सहकार्य लाभले आहे.

या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उस्ताद अमजद अली खान यांच्यासह अयान अली बांगेश व अमान अली बांगेश यांच्या सरोद वादनाच्या सुरेल जुगलबंदीची जादू अनुभवता येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नामांकित कलाकार पं. संजीव अभ्यंकर (गायन) आणि कला रामनाथ (व्हायोलिन) यांचा सुरेल मेळ संगीतप्रेमींना अनुभवता येणार आहे.

आपल्या संस्कृती आणि परंपरेची ओळख कायम निर्माण करुन ठेवण्यासाठी इंडियन हेरीटेज सोसायटी सतत प्रयत्नशील असते. 1992 पासून हा महोत्सव वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलाव येथे ‘बाणगंगा महोत्सव’ या नावाने आयोजित करण्यात येत असे. मात्र हायकोर्टाच्या ध्वनी प्रदूषण प्रतिबंधात्मक निर्णयानंतर सदर हायकोर्टाच्या आदेशानुसार तो एशियाटिक लायब्ररीत स्थलांतरित करुन तो ‘मुंबई संस्कृती’ या नावाने आयोजित करण्यात येतो.

या महोत्सवाचा शासनाच्या वार्षिक पर्यटक कार्यक्रम सूचीमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे. हा महोत्सव संगीत प्रेमींमध्ये एक प्रतिष्ठित महोत्सव म्हणून परिचित आहे. या महोत्सवाला एचएएसबीसी आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पुरस्कृत केले असून महोत्सवाचे व्यवस्थापन मे. श्यामल इव्हेंट यांच्याद्वारे करण्यात येत आहे.

संगीतप्रेमींसाठी हा दोन दिवसीय महोत्सव एक पर्वणी असून सर्वांसाठी निशुल्क आहे. कार्यक्रमाची निशुल्क प्रवेशिका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे माहिती आणि आरक्षण केंद्रे, प्रितम हॉटेलजवळ, दादर, पूर्व-(24143200), गेट वे ऑफ इंडिया (22841877) आणि महाराष्ट्र वॉच कंपनी, दादर पूर्व (24223011) तसेच चेतना बूक स्टॉल, काळा घोडा, फोर्ट, मुंबई (22851243) येथे उपलब्ध आहेत. तर श्यामल इव्हेंट्स-9082146894 यांच्याजवळदेखील प्रवेशिका उपलब्ध आहेत. सर्व संगीतप्रेमींनी मुंबई संस्कृती या संगीत महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांद्वारे करण्यात येत (Mumbai Sanskruti Festival) आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *