जवळचं भाडं नाकारल्यास टॅक्सी चालकांचा परवाना रद्द

जवळचं भाडं नाकारल्यास टॅक्सी चालकांचा परवाना रद्द

मुंबई : मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात लोक प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करतात. यामध्ये मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळी-पिवळी टॅक्सींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अनेकदा टॅक्सी चालकांकडून जवळचे भाडे असल्याने नाकारण्यात येते. यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय  होते. मात्र आता जवळचे भाडं नाकारणाऱ्या टॅक्सी चालकांना मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) च्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

जवळचे भाडे म्हटल्यावर टॅक्सी चालक सर्रासपणे प्रवाशांना नकार देत असल्याचा अनुभव जवळपास प्रत्येक मुंबईकराला रोज येतो. यामुळे अनेकदा प्रवाशांचे टॅक्सी चालकांसोबत वाद होतात. यावरुन अनेक प्रवाशी त्या टॅक्सी चालकाची आरटीओला तक्रार करतात. या तक्रारीनंतर आरटीओ त्यांच्यावर किरकोळ दंडात्मक कारवाई करते आणि त्यांना सोडून देते. मात्र त्यानंतरही अनेक टॅक्सी चालक जवळचे भाडे नाकारत असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आरटीओने जवळचे भाडं नाकारणाऱ्या टॅक्सी चालकांचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेकदा टॅक्सी चालकाच्या नकारामुळे प्रवाशांना कामाच्या ठिकाणी, रुग्णालयात जाण्यासाठी विलंब होतो. यामुळे प्रवाशांना मानसिक त्रासाला सामोरी जावे लागते. त्यामुळे टॅक्सी चालकांच्या या मुजोरपणाला आळा घालण्यासाठीच आरटीओने ही भूमिका घेतली आहे.

तक्रार कशी कराल?

जवळचं भाडे नाकारणाऱ्या मुजोर टॅक्सीवाल्यांच्या विरोधात सर्वसामान्यांना आता तक्रार करता येणार आहे. यासाठी तुम्हाला टॅक्सीचा नंबर किंवा त्याचा बिल्ला नंबर असणे गरजेचे आहे. आरटीओच्या 1800-220-110 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करुन तुम्ही तक्रार दाखल करु शकता. या माहितीवरुन त्या टॅक्सी-रिक्षा चालकांची माहिती घेऊन आरटीओद्वारे कारवाई करण्यात येईल.

वडाळा आरटीओमध्ये रिक्षा टॅक्सीच्या 999 तक्रारी

हा नियम लागू केल्यानंतर वडाळाच्या आरटीओमध्ये रिक्षा – टॅक्सीच्या 999 तक्रारी दाखल झाल्या. या तक्रारांपैकी 485 तक्रारी वडाळा आरटीओ यांनी निकाली काढल्या आहेत. तसेच कारवाई करत असताना 495 लायसन्स रद्द केले आहेत. 999 तक्रारींमध्ये 708 रिक्षाचालक आणि 291 मीटर टॅक्सी यांचा समावेश आहे. चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वडाळा आरटीओने दोषी चालकांकडून 12 लाख 88 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर ताडदेव आरटीओने आतापर्यंत 7 लाख 52 हजार 700 रुपये दोषी चालकांकडून वसूल केले आहेत. अशी माहिती आरटीओकडून देण्यात आली.

नागरिकांना जर टॅक्सी किंवा रिक्षा चालकाकडून जवळचे भाडं नाकारण्यात आलं. तर तातडीने त्या टॅक्सी चालकाची तक्रार आरटीओने दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर दाखल करणे आवश्यक आहे. ही तक्रार केल्यानंतर त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असेही आरटीओने जाहीर केले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *