‘दिलदार राजा’कडून नवीकोरी गाडी घेतलीत, मनसेचा संजय राऊतांना टोला

मी ओसामा बिन लादेनशी बोललो होतो आणि त्याला 9/11 नंतर दम पण दिला होता, असा टोलाही संदीप देशपांडेंनी लगावला

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:54 AM, 16 Jan 2020

मुंबई : मी दाऊद इब्राहिमला दम भरला आहे, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर मनसेकडून त्यांना कानपिचक्या लगावण्यात आल्या आहेत. मी ओसामा बिन लादेनशी बोललो होतो, असं ट्वीट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. तर मनसैनिकांनी आपली गाडी जाळल्याचं संजय राऊतांनी सांगितल्यावर, राज ठाकरेंकडून तुम्ही नवीकोरी गाडी घेतली होतीत, अशी आठवणही देशपांडेंनी (Sandeep Deshpande taunts Sanjay Raut) करुन दिली.

‘मी ओसामा बिन लादेनशी बोललो होतो आणि त्याला 9/11 नंतर दम पण दिला होता. आणि हो, ज्या महाराष्ट्र सैनिकांनी तुमची गाडी जाळली होती, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या “दिलदार राजाकडून” तुम्ही नवी कोरी गाडी देखील घेतली होती’ असा जळजळीत टोलाही संदीप देशपांडेंनी राऊतांना लगावला आहे. विशेष म्हणजे त्यापुढे ‘फेकाडासामनेवाला’ असा हॅशटॅग टाकून देशपांडेंनी हिणवलंही आहे.

‘लोकमत’च्या सोहळ्यात संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली होती. राज ठाकरे यांचं राज्य छोटं असलं, तरी ते  त्या राज्याचे राजे आहेत. तुमचं राज्य खालसा करा, असं आम्ही कसं म्हणणार? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला होता.

राज ठाकरे आजही आपले मित्र आहेत. त्यांनी पक्ष स्थापन केला आहे. त्यांचं ते बघतील. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, आमचं सरकार आहे. मी त्यावेळी त्यांना सांगायला गेलो होतो, असा वेगळा विचार करु नका, पण त्यावेळी गाडी जाळली गेली. राज ठाकरे यांना त्यावेळी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र आज त्यांचा पक्ष थांबला, असंही राऊत म्हणाले होते.

भाजपला राज ठाकरेंना घेऊन राजकारण करायचं असेल, तर उत्तर भारतात मतांबद्दल फिरावं लागेल. आपल्याला जे झेपेल ते त्यांनी करावं, असंही संजय राऊत म्हणाले होते.

मी कोणालाही घाबरत नाही. मी मारामाऱ्याही करुन आलेलो आहे. हिंमत असेल तर कुणालाही घाबरायची गरज नाही, मग पंतप्रधान असो की अजून कुणी, मी त्या काळात दाऊद इब्राहिमलाही दम दिला होता, असं संजय राऊत म्हणाले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी करिम लाला याची भेट घेण्यासाठी यायच्या, असा दावाही संजय राऊत यांनी केला होता. Sandeep Deshpande taunts Sanjay Raut