सेनेची मंत्रिमंडळ बैठकीत 'अवनी'वरुन डरकाळी, दुष्काळावर चुप्पी!

मुंबई : एकीकडे राज्यात भीषण दुष्काळाची स्थिती असताना, राम मंदिरासाठी अयोध्यावारीची जय्यत तयारी करणाऱ्या शिवसेनेने राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीतही दुष्काळाबद्दल चकार शब्द काढला नसल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी यवतमाळमध्ये वन विभागाने ठार केलेल्या अवनी वाघिणीच्या मुद्द्यावरुन डरकाळ्या फोडल्या. मात्र, राज्यातील जनता सोसत असलेल्या दुष्काळाच्या झळांबाबत चुप्पी साधल्याचे दिसून आले. विधानसभेचे …

सेनेची मंत्रिमंडळ बैठकीत 'अवनी'वरुन डरकाळी, दुष्काळावर चुप्पी!

मुंबई : एकीकडे राज्यात भीषण दुष्काळाची स्थिती असताना, राम मंदिरासाठी अयोध्यावारीची जय्यत तयारी करणाऱ्या शिवसेनेने राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीतही दुष्काळाबद्दल चकार शब्द काढला नसल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी यवतमाळमध्ये वन विभागाने ठार केलेल्या अवनी वाघिणीच्या मुद्द्यावरुन डरकाळ्या फोडल्या. मात्र, राज्यातील जनता सोसत असलेल्या दुष्काळाच्या झळांबाबत चुप्पी साधल्याचे दिसून आले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावरुन जोरदार टीका केली आहे.

विरोधी पक्षनेत्यांची खरमरीत टीका

“अवनी वाघिणीवरुन आज शिवसेना मंत्रिमंडळात आक्रमक होण्याची नौटंकी करते आहे. मात्र महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांमध्ये 13 हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या झाल्या. तेव्हा मंत्रिमंडळाच्या एकाही बैठकीत शिवसेनेला कधी कंठ का फुटला नाही?” असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

“अवनी वाघिणीमुळे प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यातील हजारो नागरिक प्रचंड दहशतीखाली होते. त्यामुळे तिचा बंदोबस्त करणे अनिवार्यच होते. मात्र, तिला वेळीच आणि योग्य पद्धतीने जेरबंद करण्यात सरकार अपयशी ठरले. सरतेशेवटी तिला संशयास्पद पद्धतीने ठार मारण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची आवश्यकता त्यांनी विषद केली.”, असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.

विखे पाटील पुढे म्हणाले, “मागील चार वर्षांपासून भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या ‘वाघा’चा गळा आवळून धरला आहे. मात्र अधूनमधून दीनवाणीपणे गुरगुरण्यापलिकडे शिवसेना काहीही करू शकलेली नाही. ‘वाघा’चा गळा आवळण्यामध्ये आता भाजप चांगलीच पटाईत झाली आहे. सत्ता जाण्याची भीती दाखवली की, शिवसेनेचा ‘वाघ’ मूग गिळून बसतो. त्याचे नाटकी गुरगुरणे थांबते, हे महाराष्ट्राने अनेकदा अनुभवले आहे.”

राज्यातली जनता दुष्काळाच्या झळा सोसत असताना, राज्यातल्या लोकांना आधार देण्यासाठी गावागावात हिंडण्याऐवजी शिवसेनेच्या फौजा अयोध्येच्या दिशेने रवाना होत आहे. याबाबत शेतकरी आणि दुष्काळग्रस्त भागातील जनतेत आधीच रोष आहे. त्यात ज्या ठिकाणी दुष्काळाबाबत आवाज अधिक तीव्र व्हायला हवा, तिथेही शिवसेनेची चुप्पी अनेकांच्या टीकेचा विषय झाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *