मोदींच्या मुंबई दौऱ्यात शिवसेनेला निमंत्रण नाही

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या 18 डिसेंबरला ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये येणार आहे. मोदींच्या हस्ते कल्याण येथील विकास कामांचे भूमीपूजन होणार आहे. हा कार्यक्रम मंगळवारी दुपारी एक वाजता सुरू होणार आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. त्यांच्या आगमनासाठी बापगाव येथे हेलीपॅड तयार करण्यात आले आहे. या हेलीपॅडपासून मोदी कल्याण पश्चिमेतील फडके मैदानात येणार आहे. मैदान …

PM Narendra Modi, मोदींच्या मुंबई दौऱ्यात शिवसेनेला निमंत्रण नाही

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या 18 डिसेंबरला ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये येणार आहे. मोदींच्या हस्ते कल्याण येथील विकास कामांचे भूमीपूजन होणार आहे. हा कार्यक्रम मंगळवारी दुपारी एक वाजता सुरू होणार आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. त्यांच्या आगमनासाठी बापगाव येथे हेलीपॅड तयार करण्यात आले आहे. या हेलीपॅडपासून मोदी कल्याण पश्चिमेतील फडके मैदानात येणार आहे. मैदान ते हेलीपॅड या दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. फडके मैदानात मोठा स्टेज तयार करण्यात आला आहे. लोकांना बसण्याकरिता खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे. बापगाव ते फडके मैदान रस्ता चकाचक करण्यात आला आहे. रस्त्याला व्हाईट साईड पट्टी मारली आहे. डिव्हायडरला काळे पिवळे पट्टे मारण्यात आले आहे.

मोदी शहरात येणार असल्याने शहर भाजपामय झालेलं दिसून येत आहे. भाजपाचे झेंडे दुभाजक आणि चौकात लावण्यात आले आहे. शहरात मेट्रो रेल्वचा फिरता प्रतिकात्कम डबा तयार करण्यात आला आहे. सध्या या कार्यक्रमाची वातावरण निर्मिती भाजपाकडून सुरु आहे. कल्याणच्या महापौरांना कार्यक्रमास बोलावले आहे. मात्र व्यासपीठावर त्यांना स्थान दिलेले नाही. त्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे.

श्रेयवादावरुन बॅनरबाजी

एकीकडे भाजपने 32 हजार कोटीच्या भूमीपूजनाचे फलक लावले आहेत, तर शिवसेनेने या कामासाठी पाठपुरावा केल्याचे बॅनर लावले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांना व्यासपीठावर स्थान दिले आहे. दुसरीकडे शिवसेनेने पाठपुराव्याचे बॅनर लावले आहे. यावरुन शिवसेनेची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे. राजकीय शिष्टाचार म्हणून शिंदे पितापुत्र कार्यक्रमाला जाणार आहे की, त्यांच्या पक्ष प्रमुखाला बोलावले नसल्याचा राग व्यक्त करण्यासाठी अनुपस्थित राहणार आहेत हे अद्याप स्पष्ट नाही.

काय असणार आहे उद्याचे कार्यक्रम :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मंगळवार 18 डिसेंबरला सिडकोतर्फे बांधण्यात येणाऱ्या 89, 771 घरांच्या भव्य गृहनिर्माण योजनेचा शुभारंभ होणार आहे. या योजनेस पंतप्रधान आवास योजनेंतर्गत  मंजुरी मिळाली आहे. त्याचप्रमाणे ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग 5 व दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर या मेट्रो मार्ग 9 चे भुमीपूजन देखील पंतप्रधान करतील. कल्याणच्या वासुदेव बळवंत फडके मैदानावर दुपारी 2.30 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोने 89, 771 घरांच्या भव्यगृहनिर्माण योजनेचा प्रकल्प हाती घेतला आहे. या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील तळोजासह अन्य नोडमधील बस तसेच ट्रक टर्मिनल आणि रेल्वे स्थानकांजवळच्या परिसरात घरे बांधण्यात येतील. महागृहनिर्माण योजना-ऑगस्ट 2018 चा शुभारंभ करतेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरबांधणीसाठी ‘ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेन्ट’ धोरणावर भर देण्याचे आवाहन केले होते.

सिडकोच्या इतिहासातील सर्वांत मोठा गृहनिर्माण प्रकल्प

सदर गृहनिर्माण योजनेतील 89, 771 घरांपैकी 53, 493 घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तर 36, 288 घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. सदर योजनेस पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मंजुरी मिळाली असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील लाभार्थी हे 2.5 लाख रुपये तर अल्प उत्पन्न गटातील लाभार्थी हे सीएलएसएस (Credit Linked Subsidy Scheme) अंतर्गत  2.67 लाख रुपये अनुदानास पात्र असतील. सदर गृहनिर्माण प्रकल्पासाठीचा अंदाजित खर्च 18 हजार कोटी रुपये इतका आहे. सिडकोच्या आजपर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा गृहनिर्माण प्रकल्प ठरणार आहे.

रेल्वे स्थानकांतील फोरकोर्ट एरिया, ट्रक व आंतरराज्य बस टर्मिनल इमारतींवरील मोकळ्या जागा तसेच रेल्वे स्थानकांजवळचे भूखंड यांचा वापर करून तेथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांसाठी घरे बांधावीत अशा प्रकारची नाविण्यपूर्ण कल्पना सिडकोतर्फे मांडण्यात आली आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाचे उद्घाटन

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो 5 मार्गाचे देखील भूमिपूजन करण्यात येणार आहे. एकंदर 17 एलिव्हेटेड स्थानके असणाऱ्या या मेट्रोची या परिसरातील नागरिकांना प्रतिक्षा आहे. यासाठी भिवंडीतल्या कोनगाव येथे मेट्रो डेपो प्रस्तावित आहे. कल्याण कृषी बाजार समिती ते कापूरबावडी असा हा 24.5 किमीचा मार्ग आहे. यासाठी 8 हजार 417 कोटी खर्च अपेक्षित आहे. मेट्रो 9 हा मार्ग दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर असा 10 किमीचा असून या मार्गात 8 एलिव्हेटेड स्थानके असतील. यासाठी 6 हजार 607 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वर्ष 2022 मध्ये तो पूर्ण होणे अपेक्षित आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *