नाशिकनंतर भिवंडीतही शिवसेना-भाजप युतीला बंडखोरीचं ग्रहण

ठाणे : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीला बंडखोरीचं ग्रहण लागलंय. भिवंडी लोकसभेत शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामिण संपर्क प्रमुख सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांनी शेवटच्या क्षणाला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत भाजप उमेदवार कपिल पाटील यांना असणारा विरोध कायम ठेवलाय. पण निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय मतदारसंघातील नागरिकांशी बोलून शुक्रवारी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्याचं त्यांनी …

नाशिकनंतर भिवंडीतही शिवसेना-भाजप युतीला बंडखोरीचं ग्रहण

ठाणे : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीला बंडखोरीचं ग्रहण लागलंय. भिवंडी लोकसभेत शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामिण संपर्क प्रमुख सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांनी शेवटच्या क्षणाला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत भाजप उमेदवार कपिल पाटील यांना असणारा विरोध कायम ठेवलाय. पण निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय मतदारसंघातील नागरिकांशी बोलून शुक्रवारी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नाशिकमध्ये भाजपचे माणिकराव कोकाटे यांनी बंडखोरी केली आहे. त्यानंतर भिवंडीतही बंडखोरीची चिंता युतीसमोर आहे.

सुरुवातीपासून भाजपा खासदार कपिल पाटील यांना विरोध कायम ठेवत सुरेश म्हात्रे यांनी निवडणूक लढविणारच, अशी भूमिका घेतली होती. काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी शिवसेनेत राहुन प्रयत्न केल्यानंतर त्यात अपयश आलं. त्यामुळे सुरेश म्हात्रे यांना अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. या निर्णयाबाबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माझा विरोध कपिल पाटील यांना असून, भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास आमदार सुनिल राऊत यांनी बंडखोरीची धमकी दिल्याने उमेदवार बदलू शकतो, तर हीच भूमिका भिवंडीसाठी लावावी, अशी मागणी त्यांनी केली.

ग्रामीण भागातील शिवसैनिकांवर खोट्या केसेस करून त्यांना संपविण्याची भाषा करणाऱ्या कपिल पाटील यांच्या विरोधात मी शिवसेनेसाठी, शिवसैनिकांसाठी लढत असून येत्या दोन दिवसात मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा करून मी माझा निर्णय शुक्रवारी जाहीर करणार असं सुरेश म्हात्रे यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेला सुरेश म्हात्रे समर्थकांनी गर्दी केली होती. परंतु त्यांच्या समर्थनार्थ एकही शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नव्हता.

“भाजपा खासदार कपिल पाटील यांनी येथील जनतेला फक्त आश्वासनांचे गाजर दिलंय. त्यांनी केंद्र सरकारकडून कोणतेही काम या लोकसभा क्षेत्रात केले नसताना राज्य सरकारच्या एमएमआरडीएच्या माध्यमातून झालेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी त्यांचा आटापिटा असतो. मग ती कामे स्थानिक आमदार, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झाली असली तरी ती आपण केल्याचा खोटा दावा त्यांच्या कडून सुरु आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील जुने गोदाम बांधकाम नियमित करण्यासाठी सहा-सहा वेळा मुख्यमंत्र्यांसोबत भेट घेत फोटो काढून घेतले, पण तो प्रश्न सोडवला नाही. शहराचा जीवनदायी उद्योग असलेल्या यंत्रमाग व्यवसायासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नाहीत. कोणतेही पॅकेज आणले नाही. शहापूरच्या पाणी प्रश्नावर त्यांनी काही काम केले नसून मुरबाड, बदलापूर येथील समस्या सुद्धा सोडविल्या नाहीत. त्यामुळे माझी भूमिका खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात आहे,” असं सुरेश म्हात्रे म्हणाले.

“मी शिवसैनिक असून काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्यही नाही. त्यामुळे मी काँग्रेस उमेदवारीसाठी प्रयत्न करत होतो हे चुकीचे आहे. 2009 मध्ये काँग्रेसचे सुरेश टावरे  यांनी कोणतेही काम न केल्याने कोणी माझ्या उमेदवारीसाठी आग्रह धरला असेल तर त्यास मी कसा जबाबदार? सुरेश टावरे आणि कपिल पाटील यांचे संबंध चांगले आहेत. काँग्रेस उमेदवारांना काँग्रेस, राष्ट्रवादी यांचा विरोध असताना फक्त नाराज शिवसैनिकांवर उड्या मारायच्या का असा प्रश्न उपस्थित करत, महायुतीचा उमेदवार असतानाही सुनील राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात दंड थोपटले होतेच ना,” असे सांगत त्यांनी आपल्या बंडाळीची घोषणा केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *