ठाणे पालिका आयुक्त 'मातोश्री' दरबारी, महापौरांसोबतच्या वादावर तोडगा काढण्याची विनंती

ठाण्याच्या महापौर आणि महापालिका आयुक्तांमधला (Sanjeev Jaiswal at Matoshree) वाद आता थेट 'मातोश्री' दरबारी पोहोचला आहे. ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

ठाणे पालिका आयुक्त 'मातोश्री' दरबारी, महापौरांसोबतच्या वादावर तोडगा काढण्याची विनंती

मुंबई : ठाण्याच्या महापौर आणि महापालिका आयुक्तांमधला (Sanjeev Jaiswal at Matoshree) वाद आता थेट ‘मातोश्री’ दरबारी पोहोचला. ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संजीव जयस्वाल (Sanjeev Jaiswal at Matoshree) यांनी वादावर पडदा टाकण्याची विनंती केली.

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, सभापती नरेश म्हस्के, स्थायी समिती अध्यक्षांची तातडीने बैठक बोलावली. संजीव जयस्वाल निघून गेले. पण ठाण्यातील शिवसेनेचे सर्व नेते ‘मातोश्री’वर असून, उद्धव ठाकरेंनी त्यांची बैठक घेतली.

आयुक्त आणि महापौर यांच्यात महासभेतील प्रस्तावावरून मोठा वाद झाला होता. त्यात आयुक्तांनी पत्र लिहून माझ्यावर अविश्वास ठराव आणा अशी मागणी केली होती. तर महापौर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार करून आयुक्तांवर कारवाईची मागणी केली होती. त्यामुळेच आता हा वाद वाढणार की ‘मातोश्री’वर याबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीने वाद मिटला

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने ठाणे आयुक्त आणि महापौर यांच्यातला वाद मिटला, अशी माहिती शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली.

“ठाणे आयुक्त तीन चार दिवसांपूर्वी उद्धव साहेबांना भेटले होते. वाद वाढू नये ही विनंती केली होती. आज उद्धव ठाकरेंनी सर्वांना बोलवले होते. समोरासमोर बसवून जे काही समज गैरसमज होते ते दूर केले. अविश्वासाचे पत्र आयुक्तांना मागे घ्यायला सांगितले आणि विषय संपवण्यास सांगितले. महापौरांनी मुख्यमंत्र्याना जे पत्र लिहले होते ते सभागृहात आयुक्तांची उपस्थिती असावी याबाबत ते पत्र होते. शहराच्या विकास डोळ्यापुढे ठेऊन एकत्र काम करा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

मीनाक्षी शिंदे, ठाणे महापौर यांची प्रतिक्रिया

“आमच्याकडून कोणता वाद नव्हता, आयुक्तांनी सुरुवात केली होती. त्यांनी ‘मातोश्री’वर येऊन त्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. अविश्वासचे पत्र मागे घेतो असं ते म्हणाले. मी मुख्यमंत्र्याना पत्र दिलं होते ते परत घेणार नाही. कारण वाद त्यांनी सुरु केला होता. आम्ही फक्त आयुक्तांनी हजर रहावे अशा सूचना केल्या होत्या. कारण ते महासभेत वारंवार गैरहजर राहात होते. ठाणे शहराच्या विकासासाठी कितीही वाद असले तरी एकत्र कामाला लागतो. आतापण आम्ही पूर्वी जसे एकत्र काम करत होतो तसेच काम करू. वैयक्तिक वादाचा ठाण्याच्या विकासावर काही परिणाम होऊ नये या मतांचे आम्ही आहोत”, असं ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *