बाळासाहेब ठाकरेही हाजी मस्तानचे चांगले मित्र, डॉनच्या दत्तकपुत्राचा दावा

हाजी मस्तान हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चांगला मित्र होता, असा दावा मस्तानच्या दत्तकपुत्राने केला आहे.

Haji Mastan Balasaheb Thackeray relation, बाळासाहेब ठाकरेही हाजी मस्तानचे चांगले मित्र, डॉनच्या दत्तकपुत्राचा दावा

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चांगला मित्र होता, असा दावा मस्तानच्या दत्तकपुत्राने केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुंदर शेखर यांनी बाळासाहेब आणि हाजी मस्तानच्या मैत्रीचा दाखला (Haji Mastan Balasaheb Thackeray relation) दिला.

संजय राऊत योग्यच म्हणाले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी डॉन करीम लाला याला भेटायला यायच्या. इतर बरेच नेतेही करीमला भेटायला यायचे. हाजी मस्तान एक व्यापारी होते. बाळासाहेब ठाकरे हेही हाजी मस्तान यांचे चांगले मित्र होते, अशी माहिती सुंदर शेखर यांनी दिली.

माझ्या वडिलांचे काँग्रेस नेत्यांशी चांगले संबंध होते. सुशीलकुमार शिंदे, मुरली देवरा यांच्यासोबत त्यांचे घनिष्ठ नाते होते. वसंतदादा नाईक, वसंतदादा पाटील यांच्याही त्यांची भेट व्हायची. माझे वडील चांगले होते, मात्र त्यांची प्रतिमा चुकीची तयार करण्यात आली, असंही सुंदर शेखर एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

इंदिरा गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरुन राज्यभरातील राजकीय वातावरण चागलंच तापलं होतं. त्यावरुन काँग्रेस नेते मिलिंद देवरा, संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडीतील मित्रपक्षाचा नाराजीचा सूर पाहून संजय राऊत यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं. कुणी दुखावलं गेलं असेल, तर हे विधान मी मागे घेत आहे, असं संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

बाळासाहेब थोरात यांनीही नंतर नाराजी व्यक्त करत अशी वक्तव्य भविष्यात खपवून न घेण्याचा इशारा दिला. तर आदित्य ठाकरे यांनी पुनरावृत्ती कोणत्याही शिवसैनिकाकडून होणार नाही, याची ग्वाही दिली.

मुंबईत एकेकाळी अंडरवर्ल्डचा दबदबा होता. त्यावेळी मोठमोठ्या पोलिसांच्या नियुक्त्याही अंडरवर्ल्डच्या सल्ल्याने होत. त्या काळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटल्या होत्या, असं संजय राऊत म्हणाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली (Haji Mastan Balasaheb Thackeray relation) होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *